महाराष्ट्रासह, वायव्य आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान राज्यात येत्या ३० मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी जास्त राहील. सध्या विदर्भ आणि मराठवाडा हॉटस्पॉट बनले आहे. चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आज उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दरम्यान पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने शुक्रवारपासून कमाल तपमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थानच्या फालोदी येथे देशातील आत्तापर्यंतच्या उच्चाकी ५१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याच दिवशी चुरू येथे आत्तापर्यंतच्या उच्चांकी ५०.२ तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा तापमानाचा पारा ५० अंश सेल्सिअसवर पोचला आहे.
या पाठोपाठ दिल्ली येथे ४७.६ अंश, राजस्थानच्या बिकानेर येथे ४७.४, गांधीनगर येथे ४७ अंश, उत्तर प्रदेशातील झांशी येथे ४७ अंश, राजस्थापनमधील पिलानी येथे ४६.९ अंश तर महाराष्ट्रातील अकोला येथे ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर बुधवारी दिल्लीमधील पालम विभागातीतल तापमान ४७.२ अंश सेल्सिअस होते. सफदरजंगमध्ये ४५.९ अंश, लोधी रोडमध्ये ४५.१ अंश आणि आयानगरमध्ये ४६.७ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती. दरम्यान आज दिल्लीतील तापमान कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी मॉन्सून अंदमान बेटांवर आणखी वाटचाल केली आहे. दक्षिण अंदमानात तब्बल दहा दिवस अडखळलेल्या मॉन्सूनने अंदमान बेटांवरील पोर्ट ब्लेअरपर्यंत मजल मारली आहे.
Published on: 28 May 2020, 12:20 IST