ऐश्वर्या राठोड, सुनील किनगे
सर्वसामान्य शेतकऱ्याची सामाजिक आणि आर्थिक घडी अवलंबून असणारा कांदा हे महाराष्ट्रातील महत्वाचे भाजीपाल्याचे पीक. परंतु यंदाच्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाच्या भरोशावर पेरलेल्या कांदा कसा बसा आता काढणीला आला आहे. रब्बी कांद्याची तर पळता भुई थोडी झाली आहे. परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने, कांदा लागवडीवर संकट आले आहे. त्यामुळे रब्बी-उन्हाळी कांद्याला नक्कीच भाव मिळेल असे वाटते. सध्या खरीप हंगामात लागवड केलेल्या कांद्याची काढणी जिल्हयात चालू आहे. त्या अनुषंगाने कांद्याची काढणी शास्त्रोक्त पध्दतीने कशी करावी, काढणी केल्यानंतरच तंत्रज्ञान याबाबत सदरील लेखात उहापोह केला आहे.
कांदा काढणी आणि सुकविणे
कांदा पक्व होऊ लागला की नवीन पाने यायची थांबतात आणि पानातील अन्नरस कांद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होवू लागतो. कांद्याचा मानेचा माग मऊ होतो व पाने पिवळसर होवून जमिनीवर पडतात यालाच माना पडणे असे म्हणतात. माना पडायला सुरुवात झाल्यानंतर पाणी देणे बंद करावे. त्यामुळे कांद्याच्या बुडाशी असलेले मुळ सुकू लागतात आणि त्याची जमिनीवरील पकड सैल पडू लागते. साधारणपणे ५० टक्के झाडांच्या माना पडल्या की कांदा काढणी आला असे समजावे. या काळात कांदा पक्व होऊन कांद्यामध्ये साठवणुकीसाठी आवश्यक असणारे बदल घडून येत असतात.
तसेच या कांद्याच्या मानेची जाडी कमी होत जाते. रब्बी किंवा उन्हाळी हंगामात ही पक्वतेची लक्षणे ठळकपणे दिसतात. परंतु खरीप कांद्याचे ९० दिवसांनी पाणी तोडावे. त्यामुळे पुढील तीन आठवडयात कांदा पक्व कांदयाची मान व आकार बघून अंदाज घ्यावा. पाने २० टक्के ओली असताना कांदा उपटुन काढावा. अन्यथा मान जास्त वाळली तर ती कांदा उपटतांना तुटते. जमिन घट्ट नसेल तर कांदा हातानेच सहज उपटता येतो, अन्यथा कांदा खुरप्याने किंवा कुदळीने खोदुन काढावा.
काढणीनंतर कांदा ४ ते ५ दिवस पातीसह शेतात ओळीने ठेवावा. एका ओळीतील कांदे दुसऱ्या ओळीने पातीने झाकावे. या काळात कांद्याचा पापुद्रा पक्व होऊन कांद्याला चांगला रंग येतो. तसेच माना वाळून कांद्याचा गड्डा घट्ट होतो. यानंतर कांदे १५ ते २१ दिवस सावलीत सुकवावेत नंतर या कांद्याची पात ३ ते ४ सेमी मान ठेवून कापावी पात अगदी जवळ कापू नये, कारण यामुळे कांद्याचा आतील ओलसर भाग उघडा पडतो व त्यातुन रोज जंतुंचा प्रवेश सहज होतो आणि कांदा सडतो.
कांदा प्रतवारी आणि विक्री
पात कापल्यानंतर कांद्याची प्रतवारी करावी, जोड कांदा, डेंगळे आलेला कांदा चिंगळी कांदा निवडून वेगळा करावा. विशेष मोठे कांदे (६ सेमीच्या वरील), मध्यम (४ ते ६ सेमीच्या दरम्यान) आणि लहान (२ ते ६ सेमीच्या दरम्यान) अशी प्रतवारी करावी. साधारणपणे ४ ते ६ सेमी जाडीच्या कांद्याला मागणी आणि भाव चांगला मिळतो. त्यामुळे अशा आकाराचा कांदा गोळा करून त्याचा सावलीत ढीग करावा आणि साठवणूक करावयाची असल्यास एक सारखा आकाराचा कांदा साठवणुकीसाठी वापरावा.
निवडक प्रतवारी केल्यानंतर बाजारात पाठविण्याच्या दृष्टीने कांद्याचे ४० किलोचे पॅकींग करावे. त्यासाठी जाळीदार गोण्या वापराव्यात. त्यावर मालाची जात आणि पाठविणाऱ्याचे नाव स्पष्टपणे लिहावे. निर्यातीसाठी १० ते २५ किलो कांद्याचे लहान पॅकिंग करावे व ते व्यवस्थित शिवून घ्यावे. पॅकिंगसाठी गोण्या, बारीक विणीचे नायलॉन किंवा नेटलॉनच्या पिशव्या वापराव्यात.
कांदा साठवण
कांदा दररोज कोणत्या ना कोणत्या तरी रुपाने भाज्यांमध्ये आवश्यक असतो. पर्यायाने गिऱ्हाईकांना कांदा वर्षभर पुरवावा लागतो. भारतामध्ये सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत कांद्याची काढणी सतत सुरू असते. त्यामुळे सहज व कमी दरात पुरवठा होत असतो. मात्र जून ते ऑक्टोबर या काळात काढणी होत नसल्याने याकाळासाठी प्रामुख्याने कांद्याची साठवणे करणे गरजेचे ठरते.
खरीप हंगामात कांदा काढला की लगेच मागणी असल्यामुळे किंवा या कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने खरीपाचा कांदा साठविला जात नाही. रांगडा हंगामातील कांदा सुकवुन साठवून ठेऊ शकतो. मात्र खरी साठवण ही रब्बी कांद्याचीच करावी लागते. सर्वसाधारणपणे २० ते ३० टक्के कांदा साठवणीतले नुकसान सोडल्यास ४ ते ६ महिन्यापर्यंत कांदा सुव्यवस्थित साठविता येतो. अशा रीतीने खरीपातील कांद्याची काढणी, सुकविणे, प्रतवारी आणि विक्री करावी.
लेखक - ऐश्वर्या राठोड,आचार्य पदवी विद्यार्थी, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मो. ८४११८५२१६४
सुनील किनगे, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषिविद्या विभाग, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली
Published on: 03 November 2023, 12:13 IST