नवी दिल्ली: सेंद्रीय खाद्यपदार्थ महोत्सवामुळे महिला बचत गट आणि महिला स्वयं उद्योजिकांना क्षमता बांधणी तसेच आर्थिक विकासाची संधी मिळेल, असे मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीत त्यांच्या हस्ते तीन दिवसीय सेंद्रीय खाद्यपदार्थ महोत्सवाचे उद्घाटन झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. महिलांच्या वित्तीय समावेशनासाठी तसेच आर्थिक आधार देण्यासाठी अशा प्रकारची संमेलने सातत्याने भरवली जावीत, असे त्या म्हणाल्या.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणीही यावेळी उपस्थित होत्या. अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून हे तंत्रज्ञान महिला उद्योजकांपर्यंत पोहोचवायला हवे असे त्या म्हणाल्या. या महोत्सवात 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 180 पेक्षा जास्त उद्योजिका आणि बचत गट सहभागी झाले आहेत.
Published on: 22 February 2020, 08:14 IST