News

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याचे अनेक ठिकाणी वादळी वारे सुटले होते. गारपीट आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. डोळ्यांसमोर पिकं उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी हताश झाले आहेत.

Updated on 08 March, 2022 2:52 PM IST

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याचे अनेक ठिकाणी वादळी वारे सुटले होते. गारपीट आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. डोळ्यांसमोर पिकं उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी हताश झाले आहेत. यामुळे त्यांना आर्थिक फटका बसणार आहे. येत्या तीन दिवसात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि पूर्व मध्य प्रदेशात गडगडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातल्या बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला आहे. या गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. अनेकांची पीक काढणीला आली होती. मात्र आता ती जमीनदोस्त झाल्याने त्याचा काही उपयोग होणार नाही. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

काढणीसाठी आलेले गहू खराब झाले आहेत तर पपई बागांचे आणि केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीट आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सध्या कोकणासह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने कमाल तापमान घसरले आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला आहे. खरंतर वाढत्या उकाड्यापासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे मदत करण्याची मागणी होत आहे.

English Summary: hailstorm, the grass came their hands mouths was cut off
Published on: 08 March 2022, 02:52 IST