News

राज्यात एका बाजूला कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात ताफवत जाणवत आहे.

Updated on 19 March, 2020 11:48 AM IST


राज्यात एका बाजूला कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात तफावत जाणवत आहे.  आज राज्यातील वातावरण कसे असणार याविषयी आपण जाणून घेणार आहोत. राज्यातील काही ठिकाणी पावसाचे वातावरण आहे तर काही ठिकाणी उन्हाचे चटके बसत आहे.

आज पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. तर गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या अनेक ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले असून तापमानाचा पारा वाढला आहे. दरम्यान उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  मंगळवारी  खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाला, पूर्वमोसमी पावसाने जोरदार दणका दिला. गारपिटीसह आलेल्या पावसाने रब्बी गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा पिके भुईसपाट केली आहेत. तर  काल बुधवारी सकाळपर्यंत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  धुळे, जळगाव, मालेगाव, परभणी, अकोला, येथील तापमान ३७ अंशावर होते.

बंगालच्या उपसागराच्या केंद्रभागी अधिक दाब असलेली चक्राकर वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे पूर्व आणि मध्य भारतात समुद्रावरुन बाष्प पुरवठा होत आहे. यातच मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात ढगाळ हवामान निर्माण होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात झपाट्याने बदल होत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तापमानात वाढ झाली होती. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वच ठिकाणी रात्री आणि दिवसातील तापमानात घट झाली. उत्तरेकडून थंड हवेचे प्रवाह सुरू झाल्याने सर्वत्र थंडी जाणवत होती. दरम्यान मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. शेत शिवारात गारांचा खच पडलेला आहे.  विदर्भात आज आणि उद्याही  गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

English Summary: hail storm possibility in vidarbha and middle maharashtra's temperature will high
Published on: 19 March 2020, 11:44 IST