राज्यासह देशातील इतर राज्यात होणाऱ्या पावासामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पुढिल २४ तासात पुर्वेकडील भारत, उडिसा, केरळच्या आस-पास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार वारे मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान तापमानातही चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, धुळे, सोलापूर, परभणी , अकोला , बह्मपुरी, चंद्रपूर, वाशीम येथे तापमान ४० अंशांच्या पुढे होते. तर उर्वरित राज्यातील तापमान कमी झाले आहे. राज्यात पुर्वमोसमी पावसाचे ढग जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी दुपारनंतर जालना जिल्ह्यातील नळविहिरा येथे पावसाला सुरुवात झाली होती. तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात गारपिटीसह आलेल्या पावसाने शिजविलेल्या हळदीचे नुकसान झाले.
विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या मोर्शीतही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लावली. दरम्यान देशाच्या इतर राज्यातही पावसाचे संकट आहे. येत्या २४ तासात केरळच्या आस-पासच्या परिसरात आणि पुर्वेकडील भारतात. पश्चिम बंगालमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगानाच्या काही भागातही हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
Published on: 29 April 2020, 01:42 IST