राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाचा फटका ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हातातोंडाशी आलेली पिकं गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच राज्यात काही ठिकाणी गारपिट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्यावतीने (IMD) देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी आजही पाऊस होण्याची शक्यता आहे. आयएमडीने चार दिवसांचे हवामानाचे इशारे जारी केले होते. आयएमडीनं विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1481199537335455746?s=20
गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गव्हू, हरभरा आणि ज्वारीचं देखील मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. विद्युत खांबही कोसळल्याने अजूनही काही भागात विद्युत पुरवठा खंडीत आहे. तो लवकरात लवकर सुरु करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. सुरुवातीला 15 ते 20 मिनिटे गारा पडल्या. गारांचा अक्षरश: खच पडला होता. बारहाळी परिसराला वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे तासभर अवकाळी पावसाचा जोर होता. शेतात कापून ठेवलेली तूर पीक भिजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
Published on: 14 January 2022, 04:12 IST