पुणे : शेतीत काही नाही, शेती परवडत नाही. अशी वाक्ये आपण नेहमी ऐकत असतो. पण तुम्ही हुशार शेतकरी असाल तर तुम्ही शेती व्यवसायात निराश न होता त्यात यशस्वी होणार यात शंका नाही. सध्या शेती क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. त्यात जर आपण थोडं डोकं लावून शेती केली तर कोट्यवधी रुपये शेतीतून मिळू शकतात. हो, याचे उदाहरण आहे गुजरातमधील तरुण शेतकऱी, या तरुणाने आपल्या हिंमतीने, जिद्दीने आणि हुशारीने शेती करत नवा आदर्श तरुण शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
देशातील दुधाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंद जिल्हयातील देवेश पेटेल हे सेंद्रिय पद्धतीने हळद आणि आल्याचे उत्पादन घेऊन वर्षाकाठी तब्ब्ल दीड कोटी रुपये कमावत आहेत.
चौदा वर्षांपूर्वी पदवीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. सेंद्रिय पद्धतीने आले आणि हळदीचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या उत्पादनामध्ये हळूहळू सुधारणा केली. त्यानंतर त्यांनी केवळ प्राथमिक उत्पादनावर भर न देता वेगवेळ्या गोष्टी तयार करण्यावर भर दिला. आजमितीला ते लोणचे, तयार हळद, औषधी उत्पादने बनवतात. त्यांचा एकूण वार्षिक उलाढाल दीड कोटींपर्यंत पोहोचली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना ते मार्गदर्श करत असतात. इतर तरुण शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेतला आहे.
Published on: 04 August 2020, 03:15 IST