वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या पिकांवरील कीड - रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत सर्वत्र कीड रोगाचे सर्वेक्षण करण्यात येत असून परभणी जिल्हयात काही ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आढळून आला आहे. त्या अनुषंगाने गुलाबी बोंडअळीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी दिनांक ८ ऑगस्ट रोजी किटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, तालूका कृषि अधिकारी प्रभाकर बनसावडे, मंडळ कृषि अधिकारी के. एम. जाधव यांनी परभणी जिल्हयातील विविध गावांना भेटी देऊन मार्गदर्शन केले. यात पिंपळगाव (ठोंबरे), उमरी, बाभळगाव, झरी, मिर्झापूर, आर्वी व साडेगाव येथील गुलाबी बोंडअळीग्रस्त क्षेत्रांना भेटी देऊन उपाययोजना सुचविण्यात आल्या.
मौजे साडेगाव येथे आयोजीत शेतकरी मेळयाव्यात बोलतांना डॉ. अनंत बडगुजर यांनी विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब केल्यास कमी खर्चात योग्य वेळीगुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करता येते असे सांगितले.
शेतकरी बांधवांनी खालील प्रमाणे उपाययोजना तातडीने कराव्यात असे आवाहन केले.
-
सुरवातीस किडीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे व मोठ्या प्रमाणात पंतग एकत्रित गोळा करण्यासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत जेणेकरुन गुलाबी बोंडअळीचे पंतग एकत्रित मोठया प्रमाणात आकर्षित होऊन नर मादी मिलनामध्ये अडथळा आणता येईल.
-
उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा ट्रॉयडी बॅक्ट्री या परोपजिवी गांधील माशीचा वापर करावा. (1.5 लाख अंडी / हेक्टर)
-
पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
-
कापूस पिकांच्या फुलामध्ये अळी असल्यास अळीग्रस्त फुले म्हणजेच डोमकळया हाताने तोडून अळीसकट नष्ट कराव्यात.
-
निंबोळी अर्काची फवारणी करावी.
-
आर्थिक नुकसानीची पातळी एक जिवंत अळी /10 बोंडे फुले किंवा 8 पतंगसापळा सलग 3 रात्रीदिसून आल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर झाला आहे हे ग्रहीतधरुन योग्य त्या किटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात.
Published on: 16 August 2018, 12:07 IST