कृषि मंत्रालयाने सुरु केलेल्या “किसान कॉल सेंटर” योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले आहे. हे कॉल सेंटर राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये 14 विभिन्न ठिकाणी कार्यरत आहे. यासाठी 11 आकड्यांचा टोल फ्री क्रमांक 1800-180-1551 उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या क्रमांकावर देशातील कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही मोबाईल/लॅन्डलाईन नेटवर्कवरुन मोफत कॉल करता येतो. ही सेवा दररोज सकाळी ६ ते संध्याकाळी १० या कालावधीमध्ये निरंतर सुरु असते. या क्रमांकावरुन देशभरातल्या विविध २२ स्थानिक भाषांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो.
महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांसाठी पुणे मुख्यालयी कार्यरत किसान कॉल सेंटरवरुन मराठी व कोकणी या दोन भाषेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात. दररोज दोन शिफ्टमध्ये चालणारे हे कामकाज ७२ विषय तज्ज्ञांच्या मदतीने चालविले जाते. कृषि क्षेत्रातील तंत्रज्ञान व माहितीसोबतच शेतकऱ्यांना भेडसवणाऱ्या आर्थिक व सामाजिक समस्यांवर देखील समुपदेशन केले जाते.किसान कॉल सेंटरचा प्रतिनिधी फार्म टेली अॅडव्हायजर (FTA) म्हणून ओळखला जातो. हा प्रतिनिधी कृषि किंवा कृषि मान्यताप्राप्त कृषि फलोत्पादन/पशुसंवर्धन/मत्स्यव्यवसाय/ कुक्कुटपालन/मधमाशी पालन/रेशीम उद्योग/कृषिअभियांत्रिकी/कृषिपणन इत्यादी विषयातील पदवीधर किंवा उच्च पदवीधर असतो.
हे प्रतिनिधी स्थानिक भाषेमध्ये पारंगत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ताबडतोब प्रतिसाद देतात. फार्म टेली अॅडव्हायजरीद्वारे ज्या प्रश्नांची उत्तरे दिली जाऊ शकत नाही ते प्रश्न उच्चस्तरीय विशेषज्ञांकडे पाठविले जातात. हे विशेषज्ञ राज्य कृषि विभाग, भारतीय कृषि संशोधन परिषद आणि राज्य कृषि विद्यापीठांचे विशेषज्ञ आहेत. किसान कॉल सेंटरद्वारे कृषि सल्ला व विविध वस्तूच्या बाजार किंमती याबाबत लघु संदेश (SMS) प्राप्तीसाठी एम-किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी सुध्दा करण्याची व्यवस्था आहे.
Published on: 03 September 2018, 10:04 IST