नांदेड जिल्ह्यात या उन्हाळी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत ६ हजार ५७४ हेक्टरवर १०५.३५ टक्के पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रामध्ये उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र ५ हजार ४३ हेक्टर आहे. जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ६ हजार २४० हेक्टर आहे. उन्हाळी हंगामात भुईमूग, ज्वारी, मका ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. यंदा सिंचन स्रोतांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. यामुळे उन्हाळी हंगामातील पेरणी क्षेत्र वाढले आहे. आजपर्यंत झालेल्या पेरणी क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ५ हजार ४२ हेक्टरवर भुईमूग, १ हजार ७७ हेक्टर ज्वारी, ४५५ हेक्टरवर मका या पिकांची पेरणी झाली आहे. उन्हाळा हंगामातील नगदी पीक असलेल्या भुईमुगाला सर्वाधिक पसंती दिली आहे.
भुईमुगासाठी कसे कराल सिंचन व्यवस्थापन
जातीनुसार भुईमुगाचा कालावधी साधरण ९० ते ११५ दिवसांचा असू शकतो. तुषार सिंचन पद्धत उन्हाळी भुईमुगाच्या ओलीत व्यवस्थापनासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे. किंवा उगवण झाल्यानंतर लगेच पाणी द्यावे. नंतर पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाणी द्यावे. यावेळी जमिनीला भेगा पडलेल्या नाहीत. याची खात्री करुन घ्यावी. फुलोरा येण्याच्या अवस्थेपासून शेंगा पोसण्याच्या अवस्थेपर्यंत पाण्याची पाळी चुकवू नये. पाणी देताना आपल्या जमिनीचा प्रकार समजून घेतला पाहिजे. पाण्याच्या पाळ्याचे प्रमाण जमिनीचा प्रकार मगदूर, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण, चुनखडीचे प्रमाण यानुसार ठरवावे. एप्रिल -मे महिन्यात गव्हाचा गव्हांडा बारीक काड पिकाच्या ओळी(सरीत)मधील जागेत पसरवा. त्यानंतर पाण्याच्या पाळीत अंतर वाढवावे. ओलीत व्यवस्थापन करताना जमिनीला भेगा पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
खतांचा वापर
पेरणीवेळी ४ ते ५ किलो झिंक सल्फेट तसेच बोरॅक्स २ किलो प्रति एकरी द्यावे. पीक आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत पुन्हा जिप्सम १५० ते २०० किलो प्रतिएकर याप्रमाणे द्यावे.
Published on: 12 March 2020, 04:17 IST