यावर्षी महाराष्ट्रात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या अवकाळी पावसाने परत अनेक भागात आपली हजेरी लावली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे खुप नुकसान होत आहे.
तुरदाळ, भात, कपाशी इत्यादी पिक अवकाळी पावसाच्या विळख्यात सापडले आहे. फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे पण या अनियमित पावसामुळे प्रचंड नुकसान होत आहे. मागील आठवड्यापासून संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे, ह्या निसर्गाच्या लहरीपणामुळे फळबागांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. महाराष्ट्रात द्राक्षे लागवड हि मोठ्या प्रमाणात केली जाते, विशेषता नाशिक जिल्हा द्राक्षे लागवडीसाठी संपूर्ण जगात विख्यात आहे. ह्याच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात द्राक्षे उत्पादक शेतकरी अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडला आहे.
नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्राच्या एकूण द्राक्षे उत्पादनापैकी जवळपास 70 टक्के द्राक्षे उत्पादन घेतले जाते, आणि ह्या एवढ्या मोठ्या द्राक्षे पिकाला पावसाचे ग्रहण लागले आहे, असे सांगितले जात आहे की जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के लागवड हि अवकाळी पावसाने प्रभावित केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात देखील द्राक्षेच्या बऱ्यापैकी बागा आपल्याला दिसतील या भागात देखील पावसाने अवेळी येऊन पुरती वाट लावून टाकली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावर पावसाने पाणी फिरवून दिले आणि सोन्यासारखं द्राक्षे पिकांची राख करून टाकली.
शेतकऱ्यांना खर्च काढणे देखील होणार अवघड
अवकाळी पावसाने नाशिक तसेच इतर जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली त्यामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे, विशेषता द्राक्षे पिकावर याचा खुप वाईट परिणाम झाला आहे. द्राक्षे उत्पादक शेतकरी सांगताहेत की, द्राक्षे बागाला लाखोंचा खर्च हा केला आहे, आणि एवढा खर्च करून आज रोजी द्राक्षे पिक पूर्णतः हातातून गेले आहे आणि आता द्राक्षे फेकण्याबगैर आमच्याकडे काही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आलेला लागवडीचा खर्च हा देखील निघत नाही आहे.
शेतकऱ्यांना द्राक्षे पिकासाठी महागड्या फवारण्या माराव्या लागतात, छाटणी करावी लागते,महागडे खाद्य द्यावे लागते त्यामुळे खर्च हा इतर पिकांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त येतो. त्यामुळे या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका हा द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याचे सांगितलं जात आहे.
अजून बरसणार वरुणराजा
भारतीय हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की येत्या चार पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे ह्या अलर्टने शेतकऱ्यांच्या दुःखात अजून वाढ घडवून आणली आहे. हवामान खात्यानुसार गोवा, कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्यमहाराष्ट्रमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बचावासाठी उपाययोजना करून ठेवाव्यात.
Published on: 24 November 2021, 07:05 IST