महाविकास आघाडी सरकारने तीन-चार दिवसांपूर्वी आपल्या राज्य मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत वादग्रस्त निर्णयाला मंजुरी दिली. सरकारच्या या निर्णयाद्वारे एक हजार स्केअर फुट पेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या किराणा दुकानात आणि सुपर मार्केटमध्ये आता वाईन विक्री करता येणे शक्य झाले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. सत्ता पक्षाने या निर्णयाचे तोंड भरून कौतुक केले आहे, शासनाच्या मते सदर निर्णय हा द्राक्ष बागायतदारांच्या हिताचा असून यामुळे राज्यातील मेटाकुटीला आलेले द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक सुबत्ता प्राप्त करु शकतील. तसेच विरोधी पक्षाने या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवून सोडेल असा घणाघात केला आहे.
तसेच या निर्णयाचा विरोध सामाजिक क्षेत्रात देखील होत आहे, राज्यातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शासनाच्या या निर्णयाचा विरोध केला असून असा निर्णय घेण्याऐवजी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव द्या अशी बोचरी टीका अण्णांनी केली आहे. मात्र राज्यात सुरू असलेल्या वाईन-वाईनच्या या खेळात आत्ता द्राक्ष उत्पादकांचा शिरकाव झाला आहे. द्राक्ष उत्पादकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून सरकारचा हा निर्णय चुकीच्या पद्धतीने घेण्यापेक्षा त्याच्या सकारात्मक बाबींवर चर्चा करणे व त्यावर प्रकाशझोत टाकणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. वाइन ही भारतात पाच राज्यात उत्पादित केली जाते, यामुळे संबंधित राज्यातील द्राक्ष बागायतदारांना शाश्वत लाभ मिळत असतो. शिवाय वाईन मानवी आरोग्यासाठी अल्प प्रमाणात फायदेशीर असते. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर गदारोळ निर्माण न करता राजकीय वर्तुळात या निर्णयाबाबत सुरू असलेले गलिच्छ राजकारण तातडीने थांबवावे, तसेच वाइन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे असे धोरण अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटनेने अंगीकारले आहे. संघटनेचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी या निर्णयाबाबत एक पत्रकार परिषद आयोजित केली असताना सदर मत व्यक्त केले. जगदीश होळकर यांच्या मते, राज्यात 2013 पासून मॉल्समध्ये 'सेल्फ इन शोप' या पर्यायाचा अवलंब करून वाईन विक्री केली जात आहे, शासनाने आधीच अस्तित्वात असलेल्या कायद्यात एक हजार स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईन विक्री केली जाणार अशा अर्थाच्या या निर्णयाद्वारे भर घातली आहे. दरम्यान राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारण पूर्ण ढवळून निघाले आहे.
याच पार्श्वभूमीवर आपले धोरण जनतेसमोर मांडण्यासाठी अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटनेने सोमवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. वाईन विक्रीचा विषय सध्या राज्यात वेगळ्या दिशेकडे नेला जात आहे, खरे पाहता 2013 पासूनच राज्यात मॉल्समध्ये वाईन विक्रीला परवानगी आहे आता केवळ त्यात सुधारणा केली असून सेल्फ इन शोप अन्वये आता वाईन विक्री होणार आहे. म्हणून राज्यातील राजकारण्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी वाईनचा अपप्रचार करू नये तसेच शासनाच्या या निर्णयाला चुकीचे वळण देऊ नये असे मत होळकर यांनी यावेळी मांडले. भाजपाशासित मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश राज्यात वाईन विक्रीला पोषक वातावरण तयार करण्याची लगबग सुरू आहे आणि विशेष म्हणजे त्यासाठी संबंधित राज्यातील सरकार देखील अनुकूल आहे. मात्र वाईन विक्रीच्या महाराष्ट्रातील सरकारच्या धोरणावरून गलिच्छ राजकारण होत आहे हे केवळ आणि केवळ दुर्दैवी असल्याचे होळकर यांनी म्हटले आहे. द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले यांनी देखील सरकारच्या या निर्णयाचे हात फैलवून स्वागत केले आहे. वाईन विक्रीच्या निर्णयावर राज्यातील राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू असतानाच द्राक्ष बागायतदार संघाने मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या निर्णयाला विरोध करण्याऐवजी द्राक्ष बागायतदारांच्या भेटी घेऊन वाईन बाबतची सत्यता जाणून घेणे अनिवार्य आहे, राजकारण करण्यासाठी राज्यात इतर अनेक मुद्दे आहेत त्यामुळे या शेतकरी हिताच्या निर्णयाला विरोध करू नये. याउलट राज्यात वायनरी उद्योगाला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे अशी भूमिका बागायतदार संघाने घेतली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, सरकारच्या या निर्णयाला चुकीच्या दिशेला घेऊन न जाता वाईन विक्रीला प्रोत्साहन दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मते, राज्यातील मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना लीकर शॉप असे नाव देऊन आणि मागेल त्याला वाईन विक्री चे लायसन्स देऊन वाईन शॉप ची उभारणी केली गेली पाहिजे.
Published on: 01 February 2022, 03:50 IST