News

द्राक्ष उत्पादन म्हटले कि आठवतो तो पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा! नाशिक जिल्ह्याला द्राक्ष पंढरी म्हणून ख्याती प्राप्त झाली आहे. मात्र असे असले तरी गेल्या अनेक वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा व सुलतानी संकटांमुळे द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष पिकातून कवडीमोल उत्पन्न पदरी पडत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट यांचा सामना करत कसेबसे द्राक्षाचे उत्पादन घेतात मात्र उत्पादनात घट होऊनही द्राक्षाला बाजारपेठेत चांगला बाजार भाव प्राप्त होत नाही. त्यामुळेच इतिहासात पहिल्यांदाच द्राक्ष बागायतदार संघाने द्राक्ष पिकासाठी दर निश्चित केले होते. याच अनुषंगाने मागच्या महिन्यात द्राक्ष बागायतदार संघाने द्राक्ष बागायतदार व द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते, सदर बैठकीत जानेवारी महिना 82 रुपये प्रति किलो या दराने द्राक्षे खरेदी करण्याचे ठरवण्यात आले.

Updated on 19 January, 2022 12:56 PM IST

द्राक्ष निर्यातदारांनी या दरांवरती द्राक्ष खरेदी करण्याचे द्राक्ष बागायतदारांना आश्वासन देखील दिले होते. मात्र आता द्राक्षाची काढणी सुरू असताना  बैठकीत निश्चित झालेले दर परवडत नसल्याचे रडगाणे द्राक्ष निर्यातदारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे द्राक्ष पंढरीत अनेक द्राक्ष बागायतदारांचे द्राक्ष काढणी होऊन देखील विक्रीसाठी रखडलेली आहेत. जिल्ह्यात तयार झालेल्या एकंदरीत समीकरणामुळे द्राक्ष बागायतदार यांची पिळवणूक होताना नजरेस पडत आहे. द्राक्ष बागायतदारांना वर्षानुवर्ष कवडीमोल दर मिळत असल्याने द्राक्ष काढण्यासाठी देखील परवडत नव्हते म्हणूनच द्राक्ष बागायतदार संघाने एक अनोखी शक्कल लढवत हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. पण जेव्हा या निर्णयाच्या अंमलबजावणीचा विषय आला तेव्हा द्राक्ष निर्यातदारांनी हात वर केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे द्राक्ष पंढरीत निर्माण झालेल्या या समस्येवर कशा पद्धतीने मात दिली जाणार आहे हे बघावे लागेल. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या तीन ते चार वर्षापासून पावसाच्या लहरीपणामुळे व सतत बदलत असलेल्या हवामानामुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान होत होते. यामुळे उत्पादनात घट होतच होती शिवाय बाजारपेठेत चांगला दर प्राप्त होत नसल्याने द्राक्ष साठी लाखो रुपयांचा झालेला खर्च देखील द्राक्ष बागायतदारांना मिळत नव्हता. 

बाजारपेठेत द्राक्षाच्या दराबाबत कुठलीच उपाय योजना तसेच धोरण ठरवण्यात आले नसल्याने द्राक्ष बागायतदार यांची मोठी पिळवणूक होत होती. द्राक्षे खरेदी करणारे व्यापारी ज्या दरात द्राक्षे खरेदी करू इच्छित होते त्याच दरात द्राक्ष बागायतदारांना द्राक्षांची विक्री करण्याची नामुष्की ओढावली होती. मात्र द्राक्ष बागायतदार संघाने द्राक्ष बागायतदारांच्या या मोठ्या अडचणीवर एक रामबाण उपाय शोधून काढला. त्या अनुषंगाने द्राक्ष बागायतदार व द्राक्षे खरेदी करणारे व्यापारी यांच्यात एक बैठक पार पडली होती बैठकीत जानेवारी महिन्यात 82 रुपये प्रति किलो दराने द्राक्षे खरेदी करायचे असे ठरवण्यात आले होते. मात्र हा तात्पुरता दाखवण्यात आलेला एक छ्लावा होता की काय असा सवाल आता द्राक्षबागायतदार उपस्थित करताना नजरेला पडत आहेत. कारण की चार दिवसापूर्वीच द्राक्षे पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकात बैठकीत ठरवून देण्यात आलेल्या दरापेक्षा कितीतरी पटीने कमी दरात द्राक्षाची खरेदी करण्याचे प्रकरण समोर आले, त्यासंदर्भात संबंधित द्राक्ष बागायतदारांनी रितसर तक्रार देखील केल्याचे समजत आहे. 

मात्र असे असले तरी अद्यापही ठरवलेला दर आम्हाला परवडत नाही अशी भूमिका द्राक्ष निर्यातदारांनी घेतल्याने, द्राक्ष पंढरीत द्राक्षाची खरेदी जणूकाही ठप्पच झाली आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते नाशिक जिल्ह्यात भरपूर प्रमाणात द्राक्ष बागायतदार द्राक्षाचे यशस्वी उत्पादन घेत असतात मात्र जिल्ह्यात द्राक्ष खरेदी करण्यासाठी निर्यातदार खूपच मोजके असल्याने, द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष विक्री करण्यासाठी दुसरा काही पर्याय दिसत नसल्याने द्राक्ष बागायतदारांची पिळवणूक होताना दिसत आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत जवळपास 70 टक्के द्राक्ष बागांची काढणी यशस्वीरीत्या करण्यात आली आहे मात्र अजूनही मुबलक प्रमाणात द्राक्ष काढणीसाठी शिल्लक आहेत आणि अशातच द्राक्ष निर्यातदार यांचा हा मनमानी कारभार परत एकदा सुरू झाल्याने द्राक्ष बागायतदारांची कोंडी जग जाहीर दिसत आहे.

English Summary: grape grower farmer is in danger
Published on: 19 January 2022, 12:51 IST