सध्या राज्यात द्राक्ष बागांची काढणी प्रगतीपथावर आहे. द्राक्ष उत्पादणासाठी संपूर्ण राज्यात ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्षाची काढणी सुरु आहे. पुणे जिल्ह्यातही द्राक्ष बागायतदारांची द्राक्ष काढणीसाठी लगबग सुरू आहे. जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा बघायला मिळतात, या परिसरातही द्राक्षाची काढणी जोरात सुरू असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र तालुक्यातील शेतकरी आता एका वेगळ्याच अडचणीचा सामना करीत आहेत. द्राक्षाची निर्यात पूर्णता खंडित झाल्याने तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता मेटाकुटीला आल्याचे बघायला मिळत आहे. द्राक्षाची निर्यात खंडित झाली असल्याने स्थानिक द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी या संधीचा फायदा उचलत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची लूटमार करत असल्याचा गंभीर आरोप तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांनी लावला आहे.
तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांच्या मते, निर्यात ठप्प झाली असल्याने स्थानिक व्यापारी निर्यातक्षम द्राक्ष अतिशय कवडीमोल दराने खरेदी करीत आहे. आतापर्यंत द्राक्ष बागायतदारांचे लाखोंचे नुकसान नमूद करण्यात आले आहे तसेच द्राक्ष बागायतदारांनी जर निर्यात अजून काही दिवसात सुरु करण्यात आली नाही तर जवळपास चारशे कोटी रूपयांचा आर्थिक भुर्दंड तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना बसू शकतो असा अंदाज लावला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जवळपास चार हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष लागवड केली जाते. या एवढ्या मोठ्या क्षेत्रापैकी सुमारे 70 टक्के द्राक्ष बागा या जम्बो जातीच्या द्राक्षाचा आहेत. मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते, खरीप पिकां समवेतच फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले होते. या अवकाळी मुळे द्राक्षबागांवर घडकूजची समस्या उद्भवली होती. आगात बहार पकडलेल्या बागांना याचा मोठा फटका बसला होता. परंतु द्राक्ष बागायतदारांनी त्यावेळी मोठ्या हिमतीने, व योग्य नियोजनाने द्राक्ष बागांची जोपासना केली. परंतु त्यावेळी द्राक्ष बागायतदारांना मोठा खर्च करावा लागला. त्यावेळी वाढीव खर्च करून कशाबशा द्राक्षाच्या बागा वाचवल्या मात्र मध्यंतरी जवळपास एक महिना ढगाळ वातावरण, दाट धुके, आणि मोठ्या प्रमाणात पडलेली थंडी यामुळे साखर उतरण्याच्या अवस्थेत असतानाच द्राक्ष मण्यांनी तडे देण्यास सुरुवात केली.
प्रतिकूल हवामानामुळे यावेळी देखील मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचे नुकसान झाले, या विपरीत हवामानामुळे जम्बो जातीच्या द्राक्ष फुगण्यासाठी अडथळा निर्माण झाला म्हणून द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष वेलींवरचे द्राक्षाचे घड काही प्रमाणात तोडून टाकले. या सर्व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत द्राक्ष बागायतदारांनी लाखो रुपयांचा खर्च करून द्राक्ष बागा उत्पादनासाठी सज्ज केल्या, परंतु आता निर्यात ठप्प असल्याने स्थानिक द्राक्षे व्यापारी अतिशय कवडीमोल दराने द्राक्षांची खरेदी करीत आहेत. जुन्नर तालुक्यातील जम्बो जातीची द्राक्ष आपल्या शेजारील राष्ट्र चीन आणि बांगलादेश तसेच मलेशिया आणि दुबई या देशात एक्सपोर्ट केले जातात. मात्र या हंगामात डिसेंबर पासूनच या देशात निर्यात ठप्प करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष निर्यात पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी आणि स्थानिक द्राक्ष व्यापाऱ्यांची दादागिरी थांबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे निवेदन दिले आहे. द्राक्ष बागायतदारांच्या मते, जर या वेळी निर्यात सुरू असते तर द्राक्षांना शंभर रुपये किलोप्रमाणे दर अपेक्षित होता, मात्र निर्यात सुरू नसल्याने स्थानिक व्यापारी द्राक्ष बागायतदारांची अडवणूक करत मात्र 40 ते 60 रुपये किलो प्रमाणे द्राक्षांची खरेदी करत आहेत.
एवढ्या मामुली दरात जर द्राक्षांची विक्री केली तर उत्पादन खर्च काढणे देखील शक्य होणार नाही, तसेच जर परिपक्व झालेले द्राक्षे लवकर विकले गेले नाहीत तर द्राक्ष सुकायला सुरुवात होईल, असे मत द्राक्ष बागायतदारांनी मांडले आहे. एकंदरीत परिस्थिती बघता द्राक्ष बागायतदारांपुढे दुसरा कुठलाच मार्ग उपलब्ध नसल्याने द्राक्ष बागायतदार मामुली दरात द्राक्षांची विक्री करीत आहेत. या प्रकरणात सर्वात मोठी आणि विशेष बाब म्हणजे जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघटनेने फेब्रुवारी महिन्यात जम्बो जातीच्या निर्यातक्षम द्राक्षांना 90 रुपये किलो असा दर ठरवून दिला आहे, मात्र या निर्णयाला न जुमानता व्यापारी वर्गाने कमालीची सांगड घालून द्राक्षांची कवडीमोल दराने खरेदी सुरू केली आहे.
Published on: 13 February 2022, 07:10 IST