डॉ. आदिनाथ ताकटे
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने हरबरा पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची शिफारस केलेली आहे. यामध्ये योग्य जमिनीची निवड आणि पूर्व मशागत,अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर,बीजप्रक्रिया आणि जीवाणू संवर्धनाचा वापर, वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर, तणनियंत्रण, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि रोग व किडीपासून पिकांचे सरंक्षण याबाबींचा समावेश होतो.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने आजपर्यंत हरभरा पिकामध्ये १४ वाण प्रसारित केले असून यामध्ये देशी हरभरयाचे विजय,विशाल,दिग्विजय,फुले विक्रम,फुले विक्रांत आणि फुले विश्वराज तर काबुली हरभरयाचे विराट आणि कृपा हे अधिक उत्पादनक्षम वाण असून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. देशी वाणाच्या दाण्याचा रंग आकर्षक असल्यामुळे चांगला बाजारभाव मिळतो. दिवसेंदिवस शेती उद्योगात मजुरांच्या कमतरतेमुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करता येईल असा उंच वाढणारा देशी हरभरयाचा वाण फुले विक्रम हा विद्यापीठाने विकसित केला आहे. कम्बाईन हार्वेस्टरच्या सहाय्याने पिकाची काढणी करता येते. शेतकऱ्यांमध्ये हा वाण लोकप्रिय झाला आहे.
महाराष्ट्र राज्य हरभरा पिकाच्या क्षेत्र व उत्पादनामध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून २०२०-२१ मध्ये राज्यात २५.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात आली आणि त्यापासून २८.६६ लाख टन इतके उच्चांकी उत्पादन मिळाले. राज्याची उत्पादकता ११.०५ किलो प्रती हेक्टर आहे. सन २०१०-११ च्या तुलनेत आज हरभऱ्याचे ८६ टक्के क्षेत्र ११८ टक्के उत्पादन आणि १८ टक्यांनी उत्पादकतेत वाढ झालेली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या हरभरा वाणामुळे राज्याच्या हरभरा उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली असून राज्याला कडधान्यामध्ये स्वयपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने आतापर्यंत हरभऱ्याचे १४ वाण विकसित केलेले आहे.
यापैकी चार वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आले आहे.आज राज्याच्या ४० ते ५० टक्के क्षेत्रावर राहुरी कृषि विद्यापीठाच्या हरभरा वाणांची लागवड केली जाते. पारंपारिक पद्धतीमध्ये हरभरा हे पीक स्थानिक वाणाचे बियाणे वापरून केले जात होते परंतु अलीकडील काळात कृषि विद्यापीठाच्या संशोधनातून शेतकरी बांधवाना हवे असलेले जिरायत, बागायत आणि उशिरा पेरणीसाठी तसेच मर रोग प्रतिकारक्षम वाण उपलब्ध झाल्यामुळे हरभरा क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या हरभऱ्याच्या वाणांनी राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध केले आहे.
हरभरा पिकाच्या वाढीबरोबर जमिनीतील ओलावा कमी होत जातो आणि पाण्याचा ताण वाढू लागतो अशा प्रतिकूल परिस्थितीत इतर पिकांच्या तुलनेत अधिक उत्पादन देणारे आणि जमिनीचा कस वाढवणारे हरभरा पीक रब्बी हंगामासाठी वरदान आहे.
हरभरा लागवड तंत्रज्ञान -
जमिन - मध्यम ते भारी काळी कसदार , चांगल्या निचऱ्याची ,हलकी भरड ,पाणथळ चोपण किंव क्षारयुक्त जमिन हरभरा लागवडीसाठी निवडू नये.
वाण-
देशी वाण - विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत, फुले विश्वराज, जाकी ९२१८, बी.डी.ए.जी ७९७ (आकाश ), गुलक १ (गुलाबी), पी.डी.के.व्ही कांचन, पीडीकेव्ही कनक
काबुली वाण - विराट, कृपा ,पीकेव्ही २ , पीकेव्ही ४
कंबाईन हार्वेस्टर ने काढणीस उपयुक्त वाण - फुले विक्रम, पीडीकेव्ही कनक
बियाणे आणि बीजप्रक्रिया -
७० ते १२५ किलो /हेक्टरी (जाती परत्वे)
प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम +२ ग्रॅम बाविस्टीन किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे.
त्यानंतर २५ ग्रॅम प्रत्येकी रायझोबियम व पीएसबी या जैविक खतांची गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून बीजप्रक्रिया करावी.
पेरणीची योग्य वेळ -
कोरडवाहू (हस्त चरणानंतर) - २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
बागायती - २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर
पेरणीचे अंतर - ३० x १० से.मी.
काबुली वाण - ४५ x १० से.मी.
खते -
शेवटच्या वखरणीच्या वेळी ५ टन शेणखत जमिनीत मिसळावे. २५:५०:३० किलो नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी म्हणजे अंदाजे एक गोणी युरिया, सहा गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे. किंवा
१२५ किलो डीएपी आणि ५० किलो एमओपी पेरणीच्या वेळी बियाण्यालगत पडेल या पद्धतीने दुचाडी पाभरीने पेरून द्यावे.
पीक फुलोरयात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा पाण्याचा ताण पडल्यास २ टक्के युरियाची फवारणी करावी.
पीक कालावधी - ११०-१२० दिवस ( जाती परत्वे)
उत्पादन - कोरडवाहू :१२-१४ क्वि./हे बागायत: २५-३० क्वि./हे (जाती परत्वे)
हरभरा – देशी वाण
विजय
प्रसारण वर्ष - १९९३
पिकाचा कालावधी - जिरायत :८५-९० दिवस बागायती :१०५-११० दिवस
वैशिष्टे - अधिक उत्पादनक्षमता ,अवर्षणास प्रतिकारक्षम, मर रोग प्रतिकारक्षम ,जिरायत,बागायत व उशिरा पेरणीस योग्य
उत्पादन (क्विं/हे.) - महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याकरिता प्रसारित
कोरडवाहू - १४-१५ बागायती - ३५ -४० उशिरा पेरणी - १६-१८
विशाल
प्रसारण वर्ष - १९९५
पिकाचा कालावधी - ११० - ११५ दिवस
वैशिष्टे -बागायतीस योग्य ,मर रोग प्रतिकारक्षम ,आकर्षक पिवळे टपोरे दाणे ,महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
जिरायत - १४-१५ बागायती - ३०-३५
दिग्विजय
प्रसारण वर्ष - २००६
पिकाचा कालावधी - जिरायत - ९०-९५ दिवस बागायती - १०५-११० दिवस
वैशिष्टे - अवर्षणास प्रतिकारक्षम , मर रोग प्रतिकारक्षम , पिवळसर तांबूस टपोरे दाणे , जिरायत, बागायत व उशिरा पेरणीस योग्य महाराष्ट्र, राज्याकरिता प्रसारित
उत्पादन (क्विं/हे.) - जिरायत - १४-१५ बागायती - ३५-४० उशिरा पेरणी - २०-२२
फुले विक्रांत
प्रसारण वर्ष - २०१७
पिकाचा कालावधी - १०५-११० दिवस
वैशिष्टे - बागायती पेरणीस योग्य , पिवळसर तांबूस मध्यम आकारचे दाणे , मर रोग प्रतिकारक्षम, महाराष्ट्र गुजरात,प.मध्यप्रदेश आणि दक्षिण राजस्थान राज्याकरिता प्रसारित
उत्पादन (क्विं/हे.) - ३५-४२
फुले विश्वराज
प्रसारण वर्ष - २०२०
पिकाचा कालावधी - ९५-१०५ दिवस
वैशिष्टे - मर रोग प्रतिकारक्षम , जिरायत पेरणीस योग्य , पिवळसर तपकिरी , मध्यम आकारचे दाणे , जिरायत १५.६३
जाकी ९२१८
प्रसारण वर्ष - २००५
पिकाचा कालावधी - १०५-११०दिवस
वैशिष्टे - टपोरे दाणे , मर रोग प्रतिकारक्षम , जिरायत,बागायत पेरणीस योग्य , महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
जिरायत- १५-१७ बागायती - १९-२२
बी.डी.ए.जी ७९७ (आकाश )
पिकाचा कालावधी - १०५-११० दिवस
वैशिष्टे - मध्यम टपोरे दाणे , अवर्षणास प्रतिकारक्षम , मर रोग प्रतिकारक्षम , मराठवाडा विभागासाठी प्रसारित
उत्पादन (क्विं/हे.) - १५-१६
गुलक १ (गुलाबी)
प्रसारण वर्ष - २००१
पिकाचा कालावधी - ११०-११५ दिवस
वैशिष्टे - टपोरे दाणे , मर रोगास बराच प्रतिकारक्षम , अधिक उत्पादन देणारा , फुटण्यासाठी उत्तम , दाण्याचा रंग गुलाबी
उत्पादन (क्विं/हे.) - २३-२५
पी.डी.के.व्ही कांचन
प्रसारण वर्ष - २०१९
पिकाचा कालावधी - १०५-११० दिवस
वैशिष्टे - मध्यम जाडदाणा, मर रोग प्रतिकारक्षम , विदर्भात ओलितासाठी शिफारस
उत्पादन (क्विं/हे.) - २१-२३
यांत्रिक पद्धतीने (कंबाईन हार्वेस्टर) काढणीस उपयुक्त वाण
फुले विक्रम
प्रसारण वर्ष - २०१६
पिकाचा कालावधी - १०५-११० दिवस
वैशिष्टे - मध्य आकाराचे दाणे ,वाढीचा कल उंच असल्याने यांत्रिक पद्धतीने ( कंबाईन हार्वेस्टर ने) काढणी करण्यास उपयुक्त वाण , अधिक उत्पादनक्षमता , मर रोग प्रतिकारक , जिरायत ,बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य ,महाराष्ट्र, मध्यप्रदेश ,गुजरात ,द.राजस्थान ,उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागाकरिता प्रसारित
उत्पादन (क्विं/हे.)- जिरायत १६-१८,बागायत ३५-४० , उशिरा पेरणी २०-२२
पी.डी.के.व्ही कनक
प्रसारण वर्ष - २०२१
पिकाचा कालावधी - १०८ -११० दिवस
वैशिष्टे - जमिनीपासून दोन ते अडीच फूट उंच वाढणारा तसेच एक ते दोन फुटावर जमिनीच्या वर घाटे लागतात, यांत्रिक पद्धतीने काढणीस उपयुक्त वाण, मध्यम टपोरे दाणे, लवकर व एकाच वेळी परिपक्व, मर रोग प्रतिकारक्षम, जिरायत, बागायत पेरणीस योग्य, संरक्षित होतो ओलिताखाली लागवडीसाठी शिफारस, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यासाठी शिफारस
उत्पादन (क्विं/हे.)- हेक्टरी ३८ क्विंटल,हेक्टरी सरासरी उत्पादन २२-२५ क्विंटल
काबुली वाण
विराट
प्रसारण वर्ष - २००१
प्रती एकर बियाणे - ३५ ते ४० किलो
पिकाचा कालावधी - काबुली वाण
वैशिष्टे - अधिक टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम , महाराष्ट्र, राज्याकरिता प्रसारित
उत्पादन (क्विं/हे.) - जिरायत - १०-१२ सरासरी उत्पन्न -११ , बागायती - ३०-३२ सरासरी उत्पन्न - १९
कृपा
प्रसारण वर्ष - २००९
प्रतीएकर बियाणे - ४५-५० किलो
पिकाचा कालावधी - १०५-११० दिवस
वैशिष्टे - सफेद रंगाचे दाणे, अधिक टपोरे दाणे, महाराष्ट्र, कर्नाटक मध्यप्रदेश राज्याकरिता प्रसारित
उत्पादन(क्विं/हे.) - ३०-३२ , सरासरी उत्पन्न - १८
पी.के.व्ही.२
प्रसारण वर्ष - २००१
पिकाचा कालावधी - १००-१०५ दिवस
वैशिष्टे - अधिक टपोरे दाणे, लवकर परिपक्व होणारा, मर रोग प्रतिकारक्षम, हरभरयाच्या आयातीत वाणाला पर्याय, दाण्याचा रंग पांढरा ( अल्प करडी छटा )
महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
उत्पादन (क्विं/हे.) - १२-१५
पी.के.व्ही.४
प्रसारण वर्ष - २०१०
पिकाचा कालावधी - १००-१०५ दिवस
वैशिष्टे - जास्त टपोरे दाणे, दाण्याचा रंग पांढरा, बागायतीसाठी शिफारस, मर रोग साधारण प्रतिकारक्षम, परदेशातून आयात होणारया काबुली हरभरयास पर्याय
विदर्भासाठी प्रसारित
उत्पादन (क्विं/हे.) - १६-१८
लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे,मृद शास्रज्ञ,एकात्मिक शेती पद्धती,महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, मो.९४०४०३२३८९