Pune News : पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. ग्रामपंचायत निवडणुक ही एकदम प्रतिष्ठेची मानली जाते. पुणे जिल्ह्यातील नव्या आणि जुन्या अशा मिळून ३८८ ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. यामुळे उमेदवारांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता अनेकांचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे भावी सरपंचांनी आतापासूनच गावातील आराखडा आखण्यास आणि मत जपण्यास मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपद तसंच १३० रिक्त सरपंच पद या पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर मतदान होत असून सर्वसामान्यांची दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर निकाल असणार आहे.
अर्ज भरण्याची मुदत काय?
आगामी निवडणुकांसाठी येत्या १६ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या सुमारे २३१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतींची निवडणूक?
भोर, खेड तालुक्यातील प्रत्येकी ४६ ग्रामपंचायती आहेत. आंबेगाव तालुक्यात ४४, जुन्नरमध्ये ४१, बारामतीमधील ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. दौंड, शिरूर मधील प्रत्येकी १६, इंदापूर आणि हवेलीतील प्रत्येकी १४, वेल्हे आणि मावळमधील प्रत्येक ३१, पुरंदरमधील २२, मुळशीतील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत.
Published on: 04 October 2023, 01:59 IST