News

महाराष्ट्र राज्य हरभरा पिकाच्या क्षेत्र व उत्पादनामध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून २०२०-२१ मध्ये राज्यात २५.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात आली आणि त्यापासून २८.६६ लाख टन इतके उच्चांकी उत्पादन मिळाले.

Updated on 07 November, 2023 12:56 PM IST

ऐश्वर्या राठोड, डॉ. आदिनाथ ताकटे

हरबरा पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची शिफारस केलेली आहे. यामध्ये योग्य जमिनीची निवड, पूर्व मशागत, अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर, बीजप्रक्रिया, जीवाणू संवर्धनाचा वापर, वेळेवर पेरणी, पेरणीचे योग्य अंतर, तणनियंत्रण, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि रोग व किडीपासून पिकांचे सरंक्षण याबाबींचा समावेश होतो.

महाराष्ट्र राज्य हरभरा पिकाच्या क्षेत्र व उत्पादनामध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून २०२०-२१ मध्ये राज्यात २५.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात आली आणि त्यापासून २८.६६ लाख टन इतके उच्चांकी उत्पादन मिळाले. राज्याची उत्पादकता ११.०५ किलो प्रती हेक्टर आहे. सन २०१०-११ च्या तुलनेत आज हरभऱ्याचे ८६ टक्के क्षेत्र ११८ टक्के उत्पादन आणि १८ टक्यांनी उत्पादकतेत वाढ झालेली आहे. २०२१-२२ मध्ये हरभऱ्याची सर्वसाधारणपणे २६.५० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या उक्तीस अनुसरून हरभरा पिकाचे अधिकाधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी सुधारित वाणांची पेरणी कारणे आवश्यक आहे. आजपर्यंत हरभरा पिकाचे विवध वाण विद्यापीठाने प्रसारित केले असून राज्यात विद्यापीठांनी विकसित केलेले वाण शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणी करत आहे. दिवसेंदिवस शेती उद्योगात मजुरांच्या कमतरतेमुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करता येईल असे उंच वाढणारे देशी हरभरयाचे वाण ‘फुले विक्रम’ आणि ‘पीडीकेव्ही कनक’ विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी विकसित केला आहे.

लागवड तंत्रज्ञान
•मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन निवडावी. हलकी, चोपण किंवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन टाळावी.
•खरीप पीक निघाल्याबरोबर खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे.
•पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडरची किंवा २ ग्रॅम थायरम अधिक २ ग्रॅम कार्बेन्डेंझीम (बावीस्टीन) प्रती किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी व यानंतर प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम व २५० ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करावी.
•जिरायती भागात २० सष्टेंबर ते १० ऑक्टोबर, बागायती भागात २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर आणि उशिरा पेरणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. लहान आकाराच्या बियाणे असल्यास हेक्टरी ६५-७० किलो, मध्यम आकाराचे बियाणे असल्यास १०० किलो व टपोरे दाण्याचे बियाणे असल्यास हेक्टरी १२० किलो बियाणे वापरावे. सर्वसाधारणपणे जातीपरत्वे, बियांणांच्या आकारमानानुसार ७०-१०० किलो हेक्टरी बियाणे वापरावे.
•देशी वाणांची पेरणी चाड्याच्या पाभरीने ३० x १० से. मी. व काबुली वाणांची पेरणी ४५ x १० से. मी. अंतरावर करावी.
•कम्बाईन हार्वेस्टरद्रवारे काढणी करण्यासाठी ह्या वाणांची पेरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ओलीताखाली ४५ x १० सें.मी. अंतरावर करावी व त्यासाठी ५० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे. ‌‍‍‌‌
•खतमात्र प्रति हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ३० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे.
•पिकास प्रमाणशीर पाणी द्यावे. त्यासाठी सरी वरंबा लागवड पध्दत किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. जास्त पाण्यामुळे पीक उभाळणार नाही याची दक्षता घ्यावी.

कंबाईन हार्वेस्टरने काढणीस उपयुक्त हरभऱ्याचे सुधारीत वाण
फुले विक्रम
महात्मा फुले कृषि विद्यापिठाने कंबाइन हार्वेस्टरने काढणीस येणारा ‘फुले विक्रम’ हा वाण कोरडवाहू, बागायती तसेच उशिरा पेरणीसाठी विकसित केला आहे. या वाणाची शिफारस संपूर्ण महाराष्ट्रात पेरणीसाठी केली आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यात ह्या वाणांची लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापिठाने २०१६ वर्षी हा वाण प्रसारित केला.
फुले विक्रम या वाणाची परिपक्वता कालावधी साधारणता १०५ ते ११० दिवस आहे.
या जातीची उंची ५५ ते ६० सेंमी असून घाटे जमिनीपासून एक फुटावर लागतात. उंच असल्याने यांत्रिक पद्धतीने काढणीस म्हणजेच कम्बाईन हार्वेस्टरने काढणीस हा वाण उपयुक्त आहे आणि पिकाचे कुठलेही नुकसान न होता व्यवस्थित काढणी करता येते.
ही जात उंच जिरायती, कोरडवाहू, बागायत आणि उशिरा लागवडीस उपयुक्त असुन सर्वाधिक उत्पादन देणारी आहे.
दाण्यांचा आकार मध्यम असून मर रोग प्रतिकारक्षम आहे.
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश,राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यात या लागवडीची शिफारस करण्यात आली आहे.
उशीरात उशिरा (१० डिसेंबर पर्यंत) लागवड केली असता, उत्पादनात फरक पडत नाही.
यांत्रिक पद्धतीने काढता येत असल्याने पीक काढणीवरील खर्चात बचत होते.
या जातीचे जिरायतीमध्ये प्रति हेक्टरी १६.३७ क्विंटल, बागायतीमध्ये २२.२५ क्विंटल आणि उशिरा पेरणीमध्ये २१.१२ क्विंटल उत्पादन मिळते.

पी.डी.के.व्ही कनक
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी हा वाण विकसित केला आहे. महाराष्ट्रा बरोबर हे वाण मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. या वाणाची शिफारस जिरायती व बागायत पेरणीसाठी सुद्धा करण्यात आली असून दाण्याचा आकार मध्यम असून हा वाण कंबाइन हार्वेस्टरने काढणीस उपयुक्त आहे.
प्रसारण वर्ष २०२१.
हा वाण लवकर व एकाच वेळी परिपक्व होतो.
या वाणाचा परिपक्वता कालावधी साधारणता १०८ ते ११० दिवस आहे.
जमिनीपासून दोन ते अडीच फूट उंच वाढणारा तसेच एक ते दोन फुटावर जमिनीच्या वर घाटे लागत असल्याने ह वाण यांत्रिक पद्धतीने काढणीस उपयुक्त आहे.
मध्यम टपोरे दाणे असुन घाटे अळी आणि मर रोगास प्रतिकारक आहे.
१०० दाण्याचे वजन २१.७३ ग्रॅम.
जिरायत, बागायत पेरणीस योग्य त्याचबरोबर ओलिताखाली लागवडीसाठी शिफारस.
महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेश व गुजरात राज्यासाठी हे वाण पेरणीसाठी शिफारसीत.
या वाणाची हेक्टरी ३८ क्विंटल, हेक्टरी सरासरी उत्पादन २२-२५ क्विंटल उत्पादन मिळते.

लेखक - ऐश्वर्या राठोड, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मो. ८४११८५२१६४
डॉ. आदिनाथ ताकटे, मृदा शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी. मो. ९४०४०३२३८९

English Summary: Gram chana varieties suitable for harvesting with combine harvesters
Published on: 07 November 2023, 12:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)