सातारा जिल्ह्यातील कराड परिसरात ऊसाचे उत्पन्न जास्त असले तरी आता शेतकऱ्यांचा सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा असे पीक घेण्याकडे कल वाढत आहे. उत्पादित केलेल्या मालात कचरा, खडे असतील तर उत्पादित मालाला भाव कमी मिळतो. शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची निकड लक्षात घेऊन ५ मेट्रीक टन प्रतितास क्षमता असलेल्या धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली आहे, याचा कराड परिसरातील शेतकरी व धान्य व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
कराड येथील मार्केट यार्डमध्ये धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्य वखार महामंडळ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, राज्य वखार महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक व सचिव रमेश शिंगटे, कराड पंचायत समितीचे सभापती प्रविण ताटे, जयंत पाटील, वसंत पाटील, दयानंद पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना १९५७ मध्ये करण्यात आली. याला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी गती दिली.
वखार महामंडळाची १ हजार १९० गोदामे आहेत. यामध्ये पनवेल व सांगोला येथे शितगृहे आहेत. सर्व गोदामांची साठवणूक क्षमता २१.८३ लाख मे. टन इतकी आहे. या गोदामांमध्ये शेतकऱ्यांना राखीव जागा उपलब्ध करुन दिली जाते. तसेच मालाची शास्त्रशुद्ध साठवणूक केली जाते व शंभर टक्के विमा संरक्षणाबरोबर ७५ टक्क्यांपर्यंत अल्पदराने त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. कराड येथे धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. भविष्यात मालाचे पॅकींग यंत्रणा उभी करण्याचा मानस आहे.
कराड येथील वखार महामंडळामध्ये आणखीन सोयी सुविधा वाढविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे फायद्यात असलेले महामंडळ आहे. महामंडळाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात याचाही लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहनही सहकार मंत्री पाटील यांनी केले. गेल्या दोन वर्षात महामंडळाच्या एकूण ३० वखार केंद्रांवर ४५ नवीन आधुनिक गोदामांची उभारणी करण्यात आलेली आहे.
महामंडळाकडील ३० गोदामांमध्ये भारतीय खाद्य निगम यांचा साठा व्यवस्थित व पारदर्शी पद्धतीने रहावा, या करिता भारतीय खाद्य निगमने सुचविल्याप्रमाणे महामंडळामध्ये डेपो ऑनलाईन स्टिस्टम तयार करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत सर्व काही बंद असताना शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावाने खरेदी करण्यात आला. या कालावधीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाला मोठा आर्थिक लाभ झाला असल्याचे तावरे यांनी यावेळी प्रास्ताविकात सांगितले.
Published on: 03 March 2022, 10:09 IST