अकोला: अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे, शेतीतील गुणवत्ता वाढावी, सेंद्रीय शेती करावी, जे विकू शकतो तेच शेतात पिकवावे यासाठी कृषी विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी शेती उत्पादन वाढीसाठी आपल्या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 33 व्या दीक्षांत समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा प्रतिकुलपती चंद्रकांतदादा पाटील, राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्व विद्यालय झाशीचे कुलगुरू प्रा. अरविंद कुमार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे तसेच डॉ.पं.दे.कृ.वि. अकोलाचे कुलगुरु डॉ. विलास भाले व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, पाच पिढ्यापासून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी आधुनिक शिक्षण घेऊन शेतात काम करणे आवश्यक आहे असे सांगून विद्यापिठाने आपले तंत्रज्ञान चार भिंतीतून शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठासाठी 151 कोटी रूपयाचा निधी देण्यात येईल. यापैकी 50 टक्के निधी संशोधनावर खर्च करावा, असे त्यांनी विद्यापीठाला निर्देशित केले. विद्यार्थ्यांनी लालबहाद्दूर शास्त्री यांनी देशाला दिलेला जय जवान, जय किसान या मुलमत्रांचा अवलंब करून भारत मातेच्या शेतकऱ्यांची सेवा करावी व शेतकऱ्यांना मजबुरीतून मजबुतीकडे नेण्यासाठी प्रयत्न करावे. शासन सर्वोपरी मदत करण्यास तयार असून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या उत्पादन वाढीसाठी शासन कटिबध्द असून राज्य तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे.
यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी स्वागतपर प्रास्ताविकातुन विद्यापीठाच्या वाटचालीचा आलेख उपस्थिता समोर मांडला. या पदवीदान समारंभात 2068 पदवीधरांना पदवीदान करण्यात आले. यात बी.एस.सी. कृषीचे 1464, बी.एस.सी. उद्यानविद्या 104, बी.एस.सी. कृषी जैवतंत्रज्ञान 46, बी.टेक कृषी अभियांत्रिकी 79, बी.एस.सी. वनविद्या 25, बी.एस.सी. कृषी व्यवसाय व्यवस्थापन 25, बी.एस.सी. अन्नशास्त्र 15, एम.एस.सी. कृषी 205 आणि पी.एच.डी.च्या 24 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषकाचे वितरण करण्यात आले. एम.एस.सी. कृषी पदवी परिक्षेत सर्वाधिक मुल्यांक प्राप्त करून लालसिंग राठोड यांनी पाच सुवर्ण पदक व एक रौप्य पदक मिळविले. बी.एस.सी. कृषी पदवी परिक्षेत सर्वाधिक मुल्यांकन प्राप्त करून स्नेहल विनय चव्हाण या विद्यार्थींनीने तीन सुवर्ण, तीन रौप्य व तीन रोख पारितोषिक मिळविले.
उत्कृष्ट शिक्षक म्हणून डॉ. निरज सातपुते यांना रजत पदक तसेच आयसीएआरचे उत्कृष्ट शिक्षक पारितोषिक डॉ. यु. एस. कुलकर्णी यांना देवुन सन्मानित केले. यावेळेस डॉ. पी. एच. बकाने, डॉ. एम. बी. नागदेवे, कु. एम. बी. खेडकर, डॉ. एस. आर. काळबांडे, डॉ. यु. एस. कुलकर्णी, व्ही. पी. खांबलकर, यांना उत्कृष्ट संशोधन केल्याबद्दल तसेच संशोधन कार्यासाठी व विद्यापीठ क्षेत्रातील शेतकऱ्यांना तात्काळ पोचविण्यासाठी यांना रोख पारितोषिक देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट संशोधन केल्याबद्दल डॉ. शामसुल हयात मो. शेक यांना सुवर्ण पदक देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ट कर्मचारी म्हणून जे. आर. गांवडे व जी. एस. होगे यांना रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरीया, आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय रायमुलकर व माजी आमदार श्री. जवेरी तसेच विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेचे सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
Published on: 06 February 2019, 07:34 IST