नवी दिल्ली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी एक घोषणा केली आहे. केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा २ हजार ४१० रुपये दराने खरेदी करण्यात येणार आहे.
नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांदा आजपासूनच खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. अहमदनगर, नाशिक, लासलगाव आदी केंद्रांवरुन हा कांदा खरेदी करण्यात येणार आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली होती गोयल यांची भेट
कांदा निर्यातीवर अचानक ४० टक्के शुल्क लावण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक आक्रमक झाले आहेत. या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यानंतर आज (दि.२२) राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यानंतर दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे.
दरम्यान, केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानमधून केलीय. राज्यातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासोबत नाशिक, अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल. तसेच हा कांदा २ हजार ४१० प्रतिक्विंटल या दराने खरेदी केला जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
Published on: 22 August 2023, 04:00 IST