शेतकऱ्यांचा विकास हाच शासनाचा केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर राज्यातील कष्टकरी दुग्ध उत्पादकांच्या पाठिशी शासन खंबीरपणे आहे. मागील वर्षाच्या मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे अधिक दुधाचा प्रश्न भेडसावू नये, यासाठी शासनाने दुग्ध संकलन सहकार क्षेत्रातूनच केले.
सहकार क्षेत्राला यातून मदतच झाली, असे प्रतिपादन दुग्ध विकास, पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले.गांधेली येथील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दुग्धशाळा पाहणी दरम्यान श्री. केदार बोलत होते. मंत्री केदार म्हणाले, बाहेर राज्यातील काही दूध संस्थांनी राज्यातील दुधाची बाजारपेठ काबीज केली आहे.
यावर सर्व लोकप्रतिनिधींनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे. सध्याचा काळ कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संकटकाळ आहे. या काळात सर्वांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मतही श्री. केदार यांनी व्यक्त केले.सुरुवातीला श्री. केदार यांनी उत्पादक संघाच्या दुग्ध शाळेतील दुधापासून निर्मित विविध पदार्थांची पाहणी करून उत्पादन प्रक्रिया समजून घेतली.
यामध्ये दुग्ध शाळेतील कंदी पेढा, लस्सी, तूप, आइसक्रीम, प्रयोगशाळा, पॅकिंग आदी विभागांनाही भेटी दिल्या. भेटी दरम्यान दुग्धशाळेतील स्वच्छता, नीटनेटकेपणा याबाबत समाधान व्यक्त करत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूक श्री. केदार यांनी केले. यावेळी श्री. बागडे यांनी संपूर्ण दुग्ध शाळेतील प्रकियेबाबत श्री.केदार यांना सविस्तर माहिती दिली.
Published on: 20 April 2021, 09:48 IST