शिर्डी: शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने यशस्वी पावले उचलली आहेत. त्याचेच पहिले पाऊल म्हणजे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. यामुळे योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन व शेतीतील उत्पादन खर्च कमी झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन शेतकरीभिमुख असून त्याचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत योग्य प्रकारे होत आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सरकार आणि कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि आत्मा, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित किसान आधार संमेलनातील प्रदर्शन, पशुप्रदर्शन, पीक प्रात्यक्षिके आणि शेतकरी शास्त्रज्ञ चर्चासत्राचे उद्घाटन करताना श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रा. राम शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खा. संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील उपस्थित होते. खासदार दिलीप गांधी, आामदार शिवाजीराव कर्डीले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, अल्पभूधारक शेतकऱ्यांची क्षमता कमी असल्याने त्यांना योग्य मार्गदर्शक आणि प्रशिक्षक मिळणे गरजेचे आहे. पशुधन संवर्धनासाठी चारा पिकावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय भाषणात प्रा.राम शिंदे म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रतिकारक्षम वाण विकसीत केले आहेत, यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला असून उत्पन्न वाढत आहे. आपला नगर जिल्हा दुग्ध उत्पादनात अग्रेसर असून पशुधनात सुद्धा अग्रेसर आहे. जास्तीत जास्त चारा उत्पादनाचा उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय शासनाने घेतले आहे. किटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचे आणि मनुष्याचे आरोग्य धोक्यात आले आहे. कॅन्सरसारखे गंभीर आजार मनुष्याला उद्भवत आहे. यामुळे सेंद्रिय कृषी उत्पादनाला मागणी वाढत आहे. यासाठी सेंद्रिय शेतीचे नविन धोरण सरकारने आखले आहे. सेंद्रिय शेती बरोबरच पारंपारिक वाणांना शेतकरी पसंती देत आहे. देशी आणि पारंपारिक वाणांसारखीच चव असणारे पिकांचे वाण कृषी विद्यापीठाने विकसीत करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी कुलगुरु डॉ. एस.एस. मगर, डॉ. किसनराव लवांडे, विद्यापीठाचे संचालक डॉ. किरण कोकाटे, डॉ. अशोक फरांदे, डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, नियंत्रक श्री. विजय कोते, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद डोके उपस्थित होते. किसान आधार संमेलनाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on: 16 October 2018, 08:34 IST