मुंबई- वनप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरे मृत झाल्याच्या किंवा मनुष्यहानी झाल्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढीस लागल्या आहेत. शेतकऱ्यांना जीवितहानी सोबत वित्तहानीला मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी तसेच पशुधन मृत, अपंग किंवा जखमी झाल्यास सरकारी पातळीवरुन अर्थसहाय्य करण्यात येते.
आर्थिक मदतीच्या निकषाची संरचना पुढीलप्रमाणे:
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू:
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे (ढोल) या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना दहा लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी:
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीस कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 05 लाख रुपये व व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास 1.25 लाख रुपयांचे अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. तर व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचाराचा खर्च (खासगी रुग्णालयात उपचार करणे गरजेचे असल्यास 20,000 रुपये प्रति व्यक्ती खर्चमर्यादा) देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
पशुधनाची हानी
गाय, म्हैस, बैल या पशुधन मृत्यूप्रसंगी संबंधित मालकाला वनविभागाकडून स्वतंत्र निधी देण्याची तरतूद आहे.
पशुधनाचा मृत्यू:
पशुधनाच्या बाबतीत गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास चालू बाजारभावाच्या 75 टक्के किंवा कमाल 40,000 रुपये यापैकी कमी असणाऱ्या रकमेचे अर्थसहाय्य प्रदान केले जाते.
मेंढी, बकरी किंवा तत्सम पशुधन दगावल्यास चालू बाजारभावाच्या 75 टक्के किंवा कमाल 10,000 रुपये यापैकी कमी असणाऱ्या रकमेचे अर्थसहाय्य प्रदान केले जाते.
वन्यप्राण्यांपासून पिकांच्या व फळझाडांच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल देण्यात येणाऱ्या सरकारी अर्थसहाय्य रक्कमेबाबत देखील स्वतंत्र स्वरुपाची तरतूद आहे.
अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या इतर अटी व शर्ती :
पिक नुकसानीची तक्रार अधिकारक्षेत्र असलेले नजीकचे वनरक्षक, वनपाल अगर वन परिक्षेत्र अधिकारी यांचेपैकी कोणाकडेही घटना घडल्यापासून तीन दिवसात करावी. त्याची शहानिशा करून संबंधित वनपाल, सरपंच, ग्रामसेवक/तलाठी व कृषी अधिकारी या चार सदस्यांच्या समितीमार्फत पंचनामा करणे, नुकसान क्षेत्राची मोजणी करणे, पुरावे तपासणे व नुकसानीचे मूल्य ठरविणे, या बाबी पार पडल्या जातील. मदत प्रती हेक्टरी न राहता प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीवर अवलंबून राहिल.
Published on: 19 September 2021, 01:15 IST