परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्पास नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्कार दिनांक 16 रोजी परिषदेच्या 91 वा स्थापना दिनी देशाचे माननीय कृषीमंत्री श्री. नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
नवी दिल्ली येथे आयोजित या समांरभात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्र यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार, डॉ. आनंद गोरे, डॉ. मेघा जगताप, डॉ. पपिता गौरखेडे यांना एक लाख रूपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच भारतीय कृषी संशोधन परिषदेचा प्रतिष्ठीत असा पुरस्कार प्राप्त झाला असुन यात डॉ. भगवान आसेवार, डॉ. मदन पेंडके, डॉ. सुरेंद्र चौलवार, डॉ. अनिल गोरे, डॉ. मेघा जगताप, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. रविंद्र चारी या शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्पाच्या उल्लेखनीय कार्याची दखल
सदरिल पुरस्कार अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्पाच्या कोरडवाहु शेती मधील उल्लेखनीय संशोधन कार्य, तंत्रज्ञान विकास, व त्याचा शेतकऱ्यांमधील प्रचार व प्रसार आदी कार्याची दखल घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषदेने जाहिर केला आहे. या संशोधन कार्यात शेततळे व पाण्याचा पुर्नवापर, विहिर व कुपनलिका पुर्नभरण, सोयाबीन करिता रूंद वरंबा व सरी पध्दती, मुलस्थानी जलसंधारण पध्दती, आंतरपिक पध्दती, आप्तकालीन पिक नियोजन, हवामान बदलानुरूप कोरडवाहु शेती संशोधन या बाबींचा प्रामुख्याने समावेश असुन हे तंत्रज्ञान प्रसारासाठी मोबाईल एप विकसित करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या माध्यमातुन मराठवाडयातील आठही जिल्हयासाठी आप्तकालिन पिक नियोजन आराखडा तयार करण्यात आला असुन शासनस्तरावर त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पास (पोक्रा प्रकल्प) या संशोधन केंद्रामार्फत तंत्रज्ञानात्मक पाठबळही पुरविण्यात येते. प्रकल्पामार्फत हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रम हा परभणी तालुक्यातील मौजे बाभळगांव व उजळांबा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर संशोधनात्मक प्रात्यक्षिके राबविण्यात येऊन शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. या संशोधन केंद्रामार्फत कोरडवाहु शेती निगडीत बावीस तंत्रज्ञान शिफारसी मान्य करण्यात आल्या असुन विविध तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी घडीपत्रिका, पुस्तिका, वार्तापत्र लेख आदी प्रकाशित करण्यात आले आहे.
Published on: 19 July 2019, 04:56 IST