Mumbai News : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेचा पहिला हप्ता दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 720 कोटी रुपये निधी वितरीत करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ‘नमो शेतकरी महासन्मान निधी‘ ही योजना उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केली होती. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6000 या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी 6000 इतक्या निधीची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना राबवण्यास जून 2023 मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीच्या पहिल्या हप्तापोटी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पी.एम.किसान योजनेप्रमाणे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरू आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, असेही मंत्री मुंडे यांनी सांगितले.
दरम्यान, 15 ऑक्टोबरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. दुसरा हप्ता लगेचच पुढील महिन्यात वितरित करण्यात येण्याची शक्यता आहे.
Published on: 11 October 2023, 11:09 IST