उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाडयामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. देशभरात सर्वांनाच मान्सून कधी दाखल होणार याची प्रतिक्षा आहे. दरम्यान ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे, कारण मॉन्सूनने खूशखबर दिली आहे. बुधवारी मॉन्सूनने अंदमान बेटावर आणखी वाटचाल केली. दक्षिण अंदमानात तब्बल दहा दिवस अडकलेल्या मॉन्सूनने अंदमान बेटांवरील पोर्ट ब्लेअरपर्यंतची मजल मारली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या ४८ तासांमध्ये मॉन्सून दक्षिण अरबी समुद्रातील मालदिव आणि कोमोरीन भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरातील अम्फान चक्रीवादाळमुळे रविवारी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला. मात्र चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनचे प्रवाह प्रभावित झाले. तसेच समुद्रावरील बाष्प ओढून नेल्याने या भागात कोरडे हवामान झाल्याने मॉन्सूनची कोणतीही प्रगती झाली नाही. दरम्यान मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस एक जून पर्यंत केरळात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
दक्षिण पूर्व आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात ३१ मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मॉन्सून ठरलेल्या वेळेला एक जून पर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मॉन्सूनची सुरुवात होते. एक जूनला केरळमध्ये जर मॉन्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मॉन्सूनचे वेळापत्रक बदलते. दरम्यान दिल्ली -एनसीआरमधील वातावरणात बदल झाला आहे. दक्षिण पूर्व हवा चालू असून यात गारवा आहे, यामुळे प्री - मॉन्सून पाऊस पडण्य़ाची शक्यता आहे. हवामान विभागाचा अंदाज होता की, २९-३० मे ला धुळीचे वादळ येईल, त्यानंतर पाऊस होईल. परंतु हवामानात एका दिवसाआधीच बदल झाला आहे. आज संध्याकाळ पर्यंत दिल्लीतील तापमान कमी होण्याची शक्यता आहे. जून महिना सूरू होईपर्यंत तापमान कमी होत राहणार आहे.
Published on: 28 May 2020, 05:39 IST