पंढपुरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी आज सायंकाळपासून विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. विठुरायाचे दर्शन मिळावे, यासाठी तासंतास वारकऱ्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.
कार्तिकी एकादशी ही २३ नोव्हेंबर रोजी असून दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक पंढपूरमध्ये दर्शनासाठी येत असतात. हीच बाब लक्षात घेता मंदिर समितीकडून विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू ठेवण्यात येते. यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काही दिवसांपूर्वी तयारीचा आढावा घेतला होता.
तसेच आज सायंकाळी शेजारतीनंतर देवाचा पलंग बाहेर काढला जाणार आहे. आषाढी आणि कार्तिक एकादशीनिमित्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो यामुळे देवाची विश्रांती बंद होते अशी प्रथा आहे. शेजघरातील पलंग काढून टाकल्यानंतर वारकऱ्यांना 24 तास दर्शनाचा लाभ घेता येतो ,यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Published on: 16 November 2023, 11:34 IST