बुलढाणा: जिल्ह्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि अति महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा पिकावर अवलंबून असते. जिल्ह्याच्या मलकापूर बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात तेजी बघायला मिळाली, गुरुवारी या एपीएमसीमध्ये कांद्याला सर्वसाधारण 1750 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. सध्या एपीएमसीमध्ये कांद्याला मिळत असलेला बाजार भाव समाधानकारक असल्याने कांदा उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
जिल्ह्यात अद्याप उन्हाळी कांदा काढण्याचे कार्य सुरू झालेले नाही, त्यामुळे एपीएमसीमध्ये पावसाळी कांदा विक्रीसाठी येत आहे. आगामी काही दिवसात उन्हाळी हंगामातील कांदा बाजारपेठेत दाखल होणार आहे त्यामुळे सध्या मिळत असलेला बाजार भाव उन्हाळी कांदा बाजारात येईपर्यंत कायम राहिला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावणार नाही. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असतो ते शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड करत असतात. परंतु, कांद्याला गेल्या अनेक वर्षांपासून समाधानकारक बाजार भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विशेष असा फायदा होताना बघायला मिळत नाही. मागील वर्षी मात्र कांद्याला अकराशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर प्राप्त झाला होता त्यामुळे शेतकरी बांधवांना थोडा फायदा झाला असल्याचे सांगितले जात आहे.
मागील वर्षी मिळत असलेला बाजार भाव हा अपेक्षा एवढा नसला तरीदेखील गेल्या अनेक वर्षांपासून मिळत असलेल्या दरापेक्षा अधिक असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले गेले होते हेच कारण आहे की या उन्हाळी हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड बघायला मिळाली आहे. यावर्षी कांद्याला चांगला समाधानकारक बाजार भाव होता, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची साठवणूक केली होती त्यांना या वर्षी त्यापासून चांगला मोबदला मिळाला आहे. येत्या पंधरवड्यात उन्हाळी हंगामातील कांदा बाजारपेठेत दिसू शकतो, त्यामुळे जर सध्या मिळत असलेला दर तोपर्यंत कायम राहिला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
परंतु कांदा हा नेहमी बेभरवशाचा ठरत असतो, कांदा बाजारात येऊ लागला की त्याच्या दरात लक्षणीय घट होत असते. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना अनुभव आला आहे. असे असले तरी, या हंगामात कांद्याचे बाजारभाव टिकून राहतील आणि नेहमीपेक्षा सुमारे पाचशे रुपये प्रति क्विंटल अधिक दर प्राप्त होईल अशी तज्ञांची आशा आहे. आता येणारा काळच ठरवेल की कांदा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाचे अश्रू देतो की दुःखाचे.
Published on: 27 February 2022, 09:56 IST