देशात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड बघायला मिळते, राज्यात विशेषता खांदेश प्रांतात मोठ्या प्रमाणात कापसाचे क्षेत्र आपल्या नजरेला पडेल. राज्यातील अनेक शेतकरी कापसाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. यंदा मात्र कापसाच्या क्षेत्रात कमालीची घट बघायला मिळाली, दिवसेंदिवस कापसाला लागणारा खर्च हा वाढतच होता याशिवाय ऐनवेळी मजुरांची टंचाई भासत असल्याने कापुस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते याच कारणाने राज्यात कापसाच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे जाणकार मत व्यक्त करताना दिसत होते. कापसाचे क्षेत्र घटल्याने परिणामी उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात बदल घडून आली, कापसाच्या उत्पादनात घट झाली असल्याकारणाने सुरुवातीच्या काळात कापसाला चांगला विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला.
हंगामाच्या सुरुवातीला मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने कापसाला प्रति क्विंटल दहा हजारापर्यंत बाजार भाव प्राप्त झाला, मात्र हा बाजार भाव फक्त काही दिवसांपुरताच मर्यादित राहिला. त्यानंतर कापसाच्या दरात कमालीची चढ-उतार बघायला मिळाली. कापूस व्यापारी यांच्यामते, मध्यंतरी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी लक्षणीय घटली, तसेच ओमिक्रोन व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे निर्यातीसाठी अडचणी येत असल्याने कापसाच्या दरात घट झाली. परिणामी राज्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सावध पवित्रा अंगीकारला आणि कापसाची विक्री करण्यापेक्षा साठवणूक करण्याला पसंती दर्शवली. याचा परिणाम असा झाला की बाजारात कापसाचा पुरवठा लक्षणीय कमी झाला, आणि म्हणूनच परत एकदा कापसाला चांगला बाजार भाव मिळण्याचे चित्र बघायला मिळत आहे. मध्यंतरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी कमी झाल्याने याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला आणि कापसाचे दर हे चक्क सात हजाराच्या घरात पोहचले यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती, मात्र शेतकऱ्यांनी दाखवलेल्या शहाणपणामुळे जे दर 7000 वरती अडकले होते तेच दर आता नऊ हजाराच्या घरात पोहोचले आहेत.
कापसाला मिळत असलेल्या चांगल्या बाजार भाव यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आता चांगलेच सुखावले आहेत. शेती क्षेत्रातील जाणकार लोक सांगताहेत की भविष्यात देखील कापसाची आवक मर्यादेत राहिली तर हे बाजार भाव दीर्घकाळ टिकून राहतील तसेच यात वाढ देखील होऊ शकते. यंदा सोयाबीनच्या बाजार भाव आज देखील कमालीची जड उत्तर बघायला मिळाली, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी देखील तेव्हा साठवणुकीवर भर दिला होता, त्यामुळे सोयाबीनच्या दरात देखील बऱ्यापैकी वाढ झाली होती.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी देखील साठवणुकीवर भर दिला आणि याचाच परिणाम म्हणून आज बाजारात कापसाला बर्यापैकी बाजार भाव प्राप्त होत आहे शिवाय हा बाजार भाव भविष्यात अजून वाढण्याची आशा देखील अनेक जाणकार लोकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Published on: 28 December 2021, 08:38 IST