शनिवार (दि.7) रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवन येथे GST परिषदेची 52 वी बैठक पार पडली आहे. या बैठकीत जीएसटी कौन्सिलने मोठा निर्णय घेतला आहे. या परिषदेत भरड धान्याच्या पिठावरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. भरड धान्याच्या उत्पादनांवरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.
यापूर्वी जीएसटी कौन्सिलच्या फिटमेंट कमिटीने भरड धान्याच्या उत्पादनांना जीएसटीमधून सूट देण्याची मागणी केली होती. परंतु समितीने भरडधान्यांपासून तयार केलेल्या उत्पादनांना कोणतेही प्रोत्साहन देण्यास संमती दिली नाही. मात्र,आता भरड धान्यापासून बनवलेल्या उत्पादनावरील GST चा दर कमी केल्यामुळं ज्वारी-बाजरीसह अन्य पदार्थ स्वस्त मिळणार आहेत. भारत 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' म्हणून साजरे करत असुन भरड धान्याचे उत्पादन व वापराला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
यापूर्वी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले होते की, पाण्याचा कमी वापर आणि खते कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून बाजरी पिकवता येते. त्यामुळं भरडधान्याचं उत्पादन घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कर दर, धोरणातील बदल आणि प्रशासकीय समस्यांसह नागरिक आणि व्यवसायांवरील कर ओझे कमी करणे या बाबींवर चर्चा करण्यासाठी जीएसटी परिषद वेळोवेळी बैठक घेते.
Published on: 08 October 2023, 02:01 IST