राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. कालपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. तर हवामान खात्याने मुंबई परिसरात आज (५ ऑगस्ट) रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भागादरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. काल मंगळवारपासून ते शनिवार ७ ऑगस्टपर्यंत कोकण, घाटमाथ्यावर विदर्भाच्या पूर्व भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठावाड्यात व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या परिसरात समुद्रसपाटीपासून २.१ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर उत्तर भागात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आहे. तसेच उत्तर भारतात दाखल झालेल्या मॉन्सूनचा पट्टा गंगासागर ते बंगाल उपसागराच्या ईशान्य भागापर्यंत आहे. राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्रात गेल्या दिवसांपासून ढगाळ हवामानाची स्थिती आहे. दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरणासह पाऊस पडला.
दरम्यान मुंबई शहरात कालपासून पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुंबई शहरातील हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, गोयल देऊळ, भेंडी बाजार जंक्शन, ठाकुरद्वार नाका, षण्मुखानंद हॉल, शेख मिस्त्री दरगाह मार्ग, पोस्टल कॉलनी या भागात मोठ्या प्रमाणात सगळीकडे पाणी साचले आहे. शहरात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
शहरात पावसाचे पाणी साचल्यामुळे त्यांचा परिणाम अत्यावश्यक लोकल रेल्वेवर झाला आहे. माटुंगा, दादर, प्रभादेवी रेल्वे स्टेशनवर ट्रकच्यावर पाणी साचल्याने लोकल रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने जोर वाढला आहे. पावसामुळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदी तुडुंब भरुन वाहू लागली आहे.
Published on: 05 August 2020, 06:37 IST