News

पंढरपूर: राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे, असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले.

Updated on 20 November, 2018 7:59 AM IST


पंढरपूर: 
राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे, असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. श्री. पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी श्री. बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि सौ. आनंदी मेंगाणे (रा. मळगे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अंजली पाटील, दिपाली भोसले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, ‘मंदिर समितीची रचना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप विचार केला आहे. त्यामुळे मंदिर समितीचे कामकाज सुरळीत सुरु आहे. भक्त निवासाची सुरुवात करा. वारीच्या निमित्ताने वारकरी येतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था होईल’. राज्यात यंदा खूपच तीव्र दुष्काळ पडला आहे. या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. पण फेब्रुवारी नंतर पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. आता एक पाऊस झाला तर या समस्येवर उपाय निघू शकेल, असे श्री. पाटील म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची आवश्यक कायदेशीर कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करेल. वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी शासन निधी देईल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. अतुल भोसले यांनी प्रास्ताविकात मंदिर समितीने गेल्या दोन वर्षात केलेल्या विविध कामांची माहिती दिली. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाला शासनाने मंजुरी द्यावी. याबाबतचा कोणताही आर्थिक बोजा शासनावर पडणार नाही, असे त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक येथील श्री. मेंगाणे गेली 25 वर्षे पंढरीची वारी करतात. शेती करणाऱ्या मेंगाणे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांना विठ्ठल-रुक्मिणीची चांदीची मूर्ती आणि एसटीचा पास देण्यात आला. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांचा महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

English Summary: give strength for state out of Drought Situation
Published on: 20 November 2018, 07:55 IST