अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी अनेक संकटे घेऊन आला आहे, यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळीचा फटका सर्वात जास्त फळपिकाला विशेषता द्राक्ष बागांना बसला आहे. राज्यात जवळपास दहा हजार कोटींचे द्राक्ष पिकांचे नुकसान झाल्याचे द्राक्षे बागायतदार संघटनाने नुकतेच सांगितले होते.
राज्यात सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रमध्ये द्राक्ष लागवड दिसून येते. नाशिक, पुणे, सांगली इत्यादी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात याची लागवड लक्षणीय आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यात अवकाळी मुळे क्षतीग्रस्त बागांची नुकतीच पाहणी केली. शेट्टी यांनी सांगितलं की, शेतकरी गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झाला आहे. निसर्गाचा हा लहरीपणा शेतकऱ्याचे मोठे नुकसान करत आहे. कधी अतिवृष्टीमुळे पुरस्थिती निर्माण होते तर कधी दुष्काळामुळे पावसाची कमतरता भासते दोन्ही बाजूनी मात्र बळीराजाचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण राज्यात लक्षणीय वाढले आहे, यावर्षी देखील अवकाळीमुळे द्राक्षे उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे आणि त्याला मदतीची गरज आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांसाठी विशेष मदतिचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच, हंगामावर आधारित द्राक्ष पीक विमा योजनेत आणखी सुधारणा करावी. सांगली जिल्ह्यात क्षत्तीग्रस्त द्राक्षबागांची शेट्टी यांनी पाहणी केली यादरम्यान शेट्टी यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली तेव्हा शेट्टी यांनी हे वक्तव्य केले.
एकट्या सांगली जिल्ह्यात साडे चार हजार कोटींचे नुकसान
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे द्राक्षे बागांचे मोठे नुकसान होत आहे, सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस, जत, कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यांत जवळपास 70 हजार एकर क्षेत्र द्राक्षे पिकाच्या लागवडीखालील आहे, ह्या एवढ्या मोठ्या द्राक्षबागांचे अवकाळीने नुकसान केले आहे. अवकाळी पावसामुळे विविध प्रकारच्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव द्राक्षे बागांवर होत आहे. राजू शेट्टी यांनी पाहणी केल्यानंतर सांगितले की, द्राक्ष बागेची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी चार ते पाच लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात सरासरी चार ते साडेचार हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी.
Published on: 08 December 2021, 09:07 IST