गोंदिया जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून संचालित आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धानाची खरेदी करण्यात येते.
परंतु 2021 ते 22 या आर्थिक वर्षामध्ये केल्या गेलेल्या धान खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले व ही बाब खासदार मेंढे यांनी लोकसभेत निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री पियुष गोयल यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयला दिला. आता जिल्ह्यातील काही दिवसांपासून जो काही गैरप्रकार या संस्थांचा सुरू होता तो आता चव्हाट्यावर येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
यात धान खरेदी केंद्रांवरून होत असलेल्या गैरप्रकारांचा विचार केला तर यामध्ये अनेक संस्थाचालक शेतकऱ्यांचे बोगस सातबारे तसेच व्यापारी वर्ग शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या सातबार्यावर नियोजित संस्थेत धान विक्री करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेऊन खासदार मेंढे यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात हा मुद्दा उपस्थित केला.
यामध्ये 2021 ते 22 या आर्थिक वर्षामध्ये केल्या गेलेल्या धान खरेदी मध्ये जो काही गैरव्यवहार झाला त्याची सविस्तर माहिती मांडली. यावर मंत्री पियुष गोयल यांनी हा जो काही गैरव्यवहार झाला आहे तर हे प्रकरण आता सीबीआय कडे वळती करण्यात येत असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर जिल्ह्यात अशा प्रकारे गैरप्रकार करणाऱ्या धान खरेदी संस्थांची चौकशी देखील सीबीआयने सुरू केली आहे. या चौकशीत बऱ्याच गैरव्यवहाराच्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा:जैविक शेती करायची? मग हे कराच अधिक फायदा होईल
संस्थेवर बंदी तरीही खरेदी
यामध्ये विशेष म्हणजे गोरेगाव तालुक्यामध्ये एका संस्थेवर धान खरेदीतील गैरव्यवहार केल्याप्रकरणी धान खरेदी करता येणार नाही अशा प्रकारची बंदी घालण्यात आली आहे. परंतु तरीदेखील या संस्थेच्या संचालकांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली व मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली व त्याचे चुकारे देखील दिलेल्या नाहीत.
याबाबत चौकशी केल्यानंतर या संस्थेवर बंदी असल्याचे शेतकऱ्यांना कळाले तेव्हा एकच खळबळ उडाली. आता या संस्थेचा ही चौकशी सुरू झाली असून पुढील तपासासाठी लागणारे अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता हा प्रकार सीबीआयच्या हाती असल्याने या चौकशीतून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार समोर येईल असे दिसत आहे.( स्त्रोत-नवराष्ट्र)
Published on: 11 April 2022, 07:49 IST