अकोला: भारतीय संस्कृतीत गाईला पवित्र मानले जाते. गाईचे दूध, गोमूत्र यामध्ये औषधी गुणधर्म असतात. याशिवाय गाईच्या शेणाचा खत म्हणून वापर केला जातो. गाईच्या या सर्व गुणधर्मामुळे तिचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी गाव तेथे गोशाळा (काऊ हॉस्टेल) हा उपक्रम राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले.
आदर्श गोसेवा केंद्र ही उत्कृष्ट गोशाळा असल्याचे सांगत या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर एक गाईशी संबंधीत संशोधन केंद्राची निर्मिती केली जाईल. तसेच चारायुक्त शिवार हा उपक्रम राबविण्यात येईल. चाऱ्यासाठी फीडमिल उभारण्यात येईल. त्याचप्रमाणे राज्यात गाईंच्या आरोग्यासाठी मोबाईल व्हॅन सुरु करण्यात येईल. आपल्या देशात देशी गाईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गाईच्या शेणापासून तयार होणारे खत हे सेंद्रीय खत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे देशी गाईचे संवर्धन होणे आवश्यक आहे, यासाठी गाव तेथे काऊ हॉस्टेल (गोशाळा) हा उपक्रम राबविण्याचा मनोदयही पशुसंवर्धन मंत्र्यांनी व्यक्त केला.
संबंधित बातमी वाचण्यासाठी: पालघर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ‘काऊ क्लब’ उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही
आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प येथे राज्यस्तरीय गोवर्धन गोवंश सेवा केंद्र उभारण्यासाठी शासनने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प येथे राज्यस्तरीय गोवर्धन गोवंश सेवा केंद्राचे भूमिपूजन श्री.जानकर यांच्या हस्ते आज झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त श्री. भोजने, संस्थेचे अध्यक्ष सुभाष जैन, रा.स्व. संघाचे गोसेवा प्रमुख अजित महापात्रा, ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, ॲड. मोतीसिंह मोहता, संस्थेचे संस्थापक रतनलाल खंडेलवाल, पशुसंवर्धन अधिकारी श्री. पारडे आदींची उपस्थिती होती.
Published on: 12 October 2018, 09:11 IST