राज्यातील कोकण भागात सतत पाऊस होत असल्याने येथील सुपारी बागांवर नवं संकट आले आहे. मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ वातावरण यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपारी बागांना फळगळीने ग्रासले आहे. परिपक्क होण्याआधीच सुपारीची फळे गळून पडत आहेत. बागांमध्ये फळांचा खच साचला आहे. सलग दुसऱ्या वर्षी बागायतदारांना फळगळीचा सामना करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि मालवण तालुक्यातील काही भागात व्यापारी दृष्टीकोनातून सुपारीची लागवड केलेली आहे.
सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे सुपारी हेच मुख्य पीक आहे. परंतु अनेक कुटुंबाचा आधार असलेले सुपारीचे पीकच फळगळीमुळे धोक्यात आल्याने बागायतदार हवालदिल झाले असून त्यांची चिंता वाढली आहे. कारणा मागीलवर्षीही फळगळीचे संकट त्यांच्यावर आले होते. यंदा हे संकट आल्याने लाखोंचे नुकसान होत आहे. मुसळधार पाऊस आणि सतत ढगाळ वातावरण यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव सुपारीवर दिसून येत आहे. बुरशीमुळे जिल्ह्यातील झोळंबे, तळकट कोलझर, असनिये या गावासह परिसररातील अनेक गावांमध्ये फळगळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
मागील वर्षी नुकसान झाले असले तरी यावर्षी सुपारीला चांगला दर होता. त्यामुळे गेल्यावर्षीचे नुकसान भरून येईल, अशी अपेक्षा बागायतदारांना होती. परंतु हे वर्ष देखील वाया गेले आहे. प्रत्येक सुपारीच्या बागायत दारांच्या बागांमध्ये फळांचा ढीग साचला आहे. पडलेली फळे साठविणयासाठी बागयतदारांना घरातील जागा कमी पडत आहे. सुपारीच्या देखभालीवर मोठा खर्च बागायतदारांना करावा लागतो. परंतु यावर्षी खर्चही बागांमधून वसूल होणार नाही, अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. या फळांना नगण्य असा दर मिळतो आहे, परंतु गोळा करण्याव्यतिरिक्त बागायतदारांच्या हातात दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही.
Published on: 19 September 2020, 04:50 IST