यंदाचा ऊसाचा गाळप हंगाम चांगलाच चर्चेत राहिला आहे. यंदाचा ऊस हंगाम लांबला आहे. ऊसाचा गाळप हंगाम सुरु होऊन चार महिने होत आहेत. पण मात्र प्रश्न काही संपले नाहीत. एकरकमी एफआरपी, ऊसाचे पाचट नेमके कुणाचे असे प्रश्न समोर आले होते. याबाबतच तोडगा निघाला नसताना आता ऊस तोडणी आणि वाहतूकीमधूनही शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे समोर आले आहे.
या दोन्ही गोष्टींकरिता शेतकऱ्यांकडून आधिकचा दर आकाराला जात असल्याची माहिती एका तपासणी अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी शेतकरी प्रतिनीधींनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे. शेतकरी अनेक समस्यांचा सामना करीत आहे.
यातच ऊस तोडणीसाठी कारखानदारांची मनधरणी आणि एवढे करुनही ऊसतोड कामगारांची मनमानी यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ऊसतोडणी सुरु झाली तरी वाहतूक आणि इतर बाबींसाठी शेतकऱ्यांकडून अधिकची रक्कम आकारली जात आहे. कारखान्यातील शेतकी विभागातील कर्मचाऱ्यांचे भत्ते, पगार, फंड तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार खर्च शेतकऱ्यांच्या बिलातून केला जात आहे.
शेती गट कार्यालयांचे भाडे, मुकादम आणि वाहतूकदारांना नियमापेक्षा द्यावा लागणारा भत्ता इत्यादी खर्च शेतकऱ्यांच्या बिलातून केला जात आहे. एवढे असूनही नियमित वेळी ऊसतोडणी होत नाही. तर तोडणीला आलेल्या कामगारांना पुन्हा वेगळा खर्च हा शेतकऱ्यांना करावा लागत आहे. नियमाप्रमाणे असा कोणताही खर्च शेतकऱ्यांवर लादता येत नाही.
Published on: 02 February 2022, 05:06 IST