कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला घरातच अडकून राहावे लागत आहे. दरम्यान सरकारच्या निर्णयामुळे समाजातील अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांना दिलासा मिळणार आहे. या गटातील केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा फायदा ३ कोटी ८ लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. शुक्रवारी २४ एप्रिलापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यांना ८ रुपये किलो दराने गहू व १२ रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येणार आहे.
दरम्यान मुंबई परिक्षेत्रातील ५७ लाख लोकांना त्याचा लाभ मिळेल, अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, कैलास पगारे यांनी दिली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना स्वस्त भाव दुकानातून २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येतो. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी देशात व राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत.
परिणामी हातावर पोट असलेल्या गरीब, कष्टकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून हातावर पोट भरणाऱ्या लोकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबरोबरच केंद्राच्या योजनेतील पाच किलो तांदूळही मोफत दिला जात आहे. दरम्यान राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या बाहेर असलेल्या व अत्यल्प उत्पन्न असलेला वर्ग आर्थिक संकटात आहे. त्याचा विचार करुन केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबाना सवलतीच्या दरात अन्नधान्य वाटप करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. तसा ७ एप्रिला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
कोण येते या गटात
५९ हजार रुपयापेक्षा जास्त व एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना केशरी शिधात्रिका दिली जाते. या वर्गात ३ कोटी ८ लाख इतकी लोकसंख्या आहे. त्यांना ८ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व १२ रुपये किलो दराने प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ म्हणजे पाच किलो अन्नधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. सवलतीच्या दरातील धान्य विक्री मे व जून महिन्यासाठी करण्यात येणार आहे. मुंबई परिक्षेत्रात मुंबई व ठाणे जिल्ह्य़ातील शहरीभागाचा समावेश होतो. या परिक्षेत्रात केशरी शिधात्रिकाधारकांची संख्या १३ लाख ६२ हजार ७५२ असून सदस्य संख्या ५७ लाख २० हजार २४० इतकी आहे. शुक्रवारपासून त्यांना सवलतीच्या दरात गहू व तांदूळ देण्यात येणार आहे. त्यासाठी २९ हजार ३१० मेट्रिक टन अन्नधान्य लागणार असून, त्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आल्याचे पगारे यांनी सांगितले.
Published on: 23 April 2020, 10:20 IST