खरिप हंगामात शेतकऱ्यांना पीक घेताना खूप संकट सहन करावी लागली. रब्बीच्या हंगामात झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कबर कसली मात्र, येथेही संकटाची मालिका ही कायम राहिलेली आहे. पेरणी होताच निसर्गाचा लहरीपणा सुरू झाला होता. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली.
पेरणीनंतरही अवकाळी, गारपीट या नैसर्गिक संकटावर शेतकऱ्यांनी मात केली पण आता महावितरणाच्या मनमानी कारभारासमोर बळीराजा हताश झाला आहे.कृषीपंपासाठी 7 तास विद्युत पुरवठा तो अखंडीत, असा नियम असताना वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतशिवारामध्ये केवळ 4 कृषीपंपासाठी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी असतानाही शेतकरी हताश आहे. धरण उशाला अन् कोरड घशाला, अशी अवस्था दापुरा उपकेंद्रांतर्गच्या गावातील शेतकऱ्यांची झाली आहे.
वाशिम जिल्ह्यातील दापुरा येथील उपकेंद्रात सातत्याने बिघाड होत असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे या उपकेंद्राअंतर्गच्या गावातील रोहित्रांना दिवसातून केवळ चार तास विद्युत पुरवठा केला जात आहेत. तोही अनियमित असल्याने रब्बी हंगामातील पिके जोपासायची कशी असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानाही पिके करपून जात आहे. उपकेंद्राच्या पॉइंटवर आलटून पालटून चार तास वीज पुरवठा केला जात असल्याने सुविधांपेक्षा अडचणी अशी अवस्था झाली आहे.
यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. शिवाय दापुरा उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या इंझोरी शिवारातील इंझोरी शिवारातील नदी, नाल्यांसह विहिरी, कूपनलिकांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. सिंचनासाठी मुबलक पाणी असल्याने यंदा इंझोरीसह परिसरातील शिवारात गहू, हरभऱ्यासह रब्बी पिके व भाजीपाला पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. महिनाभरापासून वारंवार वीज खंडीत होत असून त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील उत्पादन घटले तर आता महावितरणच्या कारभाराचा फटका रब्बी हंगामात पाहवयास मिळत आहे.
Published on: 16 February 2022, 11:24 IST