वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एस. कदम यांचे दिनांक 8 मार्च रोजी दुःखद निधन झाले, ते 72 वर्षाचे होते. ते सन 2005 ते 2010 दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणुन कार्यरत होते. त्यांच्या काळात त्यांनी शेतकरी, विद्यार्थी व विद्यापीठ हितार्थ अनेक चांगले निर्णय घेतले.
परभणी कृषि विद्यापीठ जमिनी सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने अनेक पावले त्यांनी उचलली, यात संपुर्ण विद्यापीठ परिसरात सुरक्षित भिंती उभारून सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली. त्यांच्याच काळात राज्यस्तरीय विविध विस्तार कार्यक्रम राबविण्यात आले. विद्यापीठ बीजोत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने मोठे प्रयत्न केले गेले. बदनापूरच्या मोसंबी संशोधन केंद्राच्या बळकटीकरण करण्यासाठी विशेष लक्ष दिले. कापूस, तूर, सोयाबीन ही महत्वाची पिके यावर येणाऱ्या किडींमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत होते ते कमी करण्यासाठी प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यात संपुर्ण मराठवाड्यात विशेष पीक संरक्षण मोहीम राबविण्यात आली, शेतकरी बांधवाच्या थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले.
परभणी विद्यापीठ मुख्यालयी दोन कृषी तंत्रज्ञान सप्ताह यांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल, या तंत्रज्ञान सप्ताहास शेतकऱ्यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. एकाच ठिकाणी सर्व पिकांच्या विद्यापीठ विकसित वाणांचे प्रात्यक्षिक प्रक्षेत्र विकसित करण्यात आले. कोणत्याही संस्थेची प्रगती ही त्या संस्थेतील कार्यरत मनुष्यबळावर अवलंबुन असते यांची जाण त्यांना होती, शास्त्रज्ञ भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली कृषि संशोधन, शिक्षण आणि विस्तार शिक्षण हे प्रभावीपणे होण्यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले. शांत स्वभाव, मृदुभाषी पण तितकीच कठोर व पारदर्शक प्रशासन, निश्चयी नेतृत्व, वक्तशीर, चाणाक्ष व कामाचा प्रचंड आवाका असलेले व्यक्तीमत्त म्हणजेच माननीय कै. डॉ. एस. एस. कदम यांना विद्यापीठाच्या वतीने भावपुर्ण श्रध्दाजंली.
डॉ. एस. एस. कदम यांचा अल्प परिचय
डॉ. संतराम संभाजी कदम यांचा जन्म 1947 मध्ये झाला, त्यांचे मुळगांव वावरहिरे (दानवलेवाडी), ता. माण, जि. सातारा हे होते. त्यांनी पुण्याच्या कृषि महाविद्यालयातुन कृषि पदवीपुर्ण केली तर नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्थेतुन पदव्युत्तर व आचार्य पदवी प्राप्त केली. पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणुन जर्मनीत संशोधन केले तसेच इंग्लंड येथे निमंत्रित प्राध्यापक म्हणुन एक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठिशी होता. मेक्सिको व अमेरिका या देशातील संशोधन संस्थांना भेटी दिल्या होत्या. परभणी कृषि विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक म्हणनु कार्य केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणुन 1981 कार्यरत, नंतर प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, संशोधन संचालक आदी विविध पदावर काम करून सन 2005 मध्ये अधिष्ठाता पदावर निवृत्त झाले. नंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात सन 2005 ते 2010 पर्यंत पाच वर्षे कुलगुरू म्हणुन नेतृत्व केले.
अझोटोबॅक्टर जीवाणु, क्लोरेला वनस्पती, भात पिकातील नायट्रेट असिमिलेशन प्रक्रिया यावर मुलभुत संशोधन त्यांनी केले. काळी पडलेल्या ज्वारीवर प्रक्रिया करून उपयुक्त पदार्थ निर्मिती, भुईमुगावर प्रक्रिया, बोरापासुन कॅन्डी, पावडर, शीतपेय, वाईन निर्मिती, डाळिंबापासुन वाईन निर्मिती तसेच पेरू, केळी, दुधी भोपळा प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले. भुईमुगावरील संशोधनबाबात अमेरिकन सरकारचे प्रशस्तीपत्रक त्यांना देण्यात आले तर फळे व भाजीपाला प्रक्रिया संशोधनाबाबत हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया तर्फे डॉ. जे. सी. आनंद सुवर्णपदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत शंभर पेक्षा जास्त संशोधन लेख प्रसिध्द झाली तर अन्नविज्ञान व तंत्रज्ञान विषयावर 16 पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. नॅशनल अकॅडमी ऑफ अग्रीकल्चर सायन्सेसचे फेलो होते.
Published on: 10 March 2020, 08:09 IST