News

माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. 9 ऑगस्टपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Updated on 24 August, 2019 2:29 PM IST


माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. 9 ऑगस्टपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी जेटलींना कर्करोगाचेही निदान झाले होते. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये जाऊन उपचार घेतले होते. न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर सर्जरी करण्यात आली होती. तसेच त्यापूर्वी त्यांचं मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आलं होतं.

2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सरकारच्या कारभाराची घडी बसवण्यात अरूण जेटली यांचा मोठा वाटा होता. अडचणीच्या काळात सरकारची बाजू समर्थपणे मांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. जेटली यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळातच नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) सारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाच्या अंमलबजावणीतही जेटलींचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांनी कायदा आणि जलवाहतूक मंत्रालयाचा कारभार पाहिला होता. 2000 पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. 2009 मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी कामही पाहिले होते.

English Summary: former union finance minister Arun Jaitley passes away
Published on: 24 August 2019, 02:26 IST