भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासूनच सुषमा स्वराज आजारी होत्या. जवळपास दिड वर्षांपूर्वीच त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृतीच्या कारणांमुळेच त्यांनी लोकसभा निवडणूक 2019 न लढवण्याचा निर्णयदेखील जाहीर केला होता.
सुषमा स्वराज यांच्या जाण्यानं राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांनाही धक्का बसला आहे. भाजपमधल्या कणखर महिला नेत्या गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
Published on: 07 August 2019, 07:51 IST