मराठवाडा ते कोमोरिन परिसर आणि तमिळनाडू कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.
याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून मंगळवारपासून विदर्भात काही प्रमाणात उष्णतेची लाट आहे. आजही विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दरम्यान शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा दणका देणार असल्यास हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांपासून अंदमान समुद्राच्या उत्तर भाग आणि म्यानमारच्या किनारपट्टी दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे.
तर तेलंगाणा ते तमिळनाडूच्या उत्तर -दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत असून तमिळनाडूच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. यामुले उन्हाचा चटका वाढून उकाड्यात वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. वाढत्या तापमानामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी तापमानात मोठी तफावत आढळून येत असून नागपूर येथे १९.३ अंश सेल्सिअसची सर्वात किमान नोंदविले गेले.
राज्यातील बहुतांश ठिकाणचा गारठा कमी झाला आहे. पुढील काही दिवस स्थिती कायम राहणार आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याने पारा ४० अंश सेल्सिअसवर सरकला.
Published on: 07 April 2021, 02:29 IST