लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोबायीनच्या भावात कमालीची तेजी राहिली आहे. मंगळवारी सौद्यात सोयाबीनला ९ हजार ८५१ रुपये कमाल भाव मिळाला. तर शहरातील तेल उत्पादक कंपन्यांनी मात्र दहा हजार रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली आहे.
सोयाबीनच्या इतिहासात पहिल्यांदा दहा हजाराचा भाव मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेंडीची मागणी, वायदे बाजारात होणारे व्यवहार, त्यात कमी असलेली आवक या सर्वाचा परिणाम सोबायीनचे भाव वाढण्यात होत आहे.लातूर हे सोयाबीनचे आगार बनत आहे. हंगामात तर दररोज साठ ते सत्तर हजार क्विंटल सोयाबीनची आवक येथील बाजारपेठेत राहत आहे. सोयाबीनच्या पेरणीच्या क्षेत्रातही सातत्याने वाढ होत आहे.
पण गेली अनेक वर्षापासून सोयाबीनला सरासरी चार ते साडे चार हजार रुपये भाव राहिला होता. सोयाबीनाला सहा हजार रुपये भाव मिळावा म्हणून आंदोलनही झाली. पण सहा हजारापेक्षा भाव मात्र कधी वाढले नाहीत. पण या वर्षी कोरोनाच्या संकट काळात सुरवातीपासूनच सोयाबीनच्या भावात तेजी राहिली आहे.
येथील आडत बाजारात आक्टोबरमध्ये सोयाबीनला कमाल भाव चार हजार १९० रुपये राहिला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्यात त्यात सातत्याने वाढ होत गेली आहे. फेब्रुवारीमध्ये पाच हजाराचा टप्पा पार झाला. मार्चमध्ये सहा हजारापर्यंत सोयाबीन गेले. एप्रिलपासून सोयाबीनच्या भावात कधीच मंदी आली नाही. साडे सात हजार, आठ हजार असे भाव वाढत गेला.
Published on: 29 July 2021, 06:17 IST