नवी दिल्ली: 102 ट्रेनमधून 2.8 लाख मेट्रिक टन अन्नधान्याची वाहतूक पूर्ण करतानाच भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) 22 एप्रिल 2020 रोजी नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत. सर्वाधिक 46 ट्रेन पंजाबहून चालविण्यात आल्या तर त्यानंतर 18 ट्रेन चालवत तेलंगणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब आणि हरीयाणा मधून देशाच्या विविध भागात गहू आणि तांदूळ तर तेलंगणाहून केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथे उकडा तांदूळ वितरीत करण्यात आला.
एफसीआयने दररोज सरासरी 1.65 लाख मेट्रिक टन अन्नधान्य अशाप्रकारे या लॉकडाऊनच्या कालावधीत एकूण 5 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) अन्नधान्याची वाहतूक केली आहे. याच कालावधीत एफसीआय ने आपल्या गोदामामध्ये अन्नधान्याचा 4.6 एमएमटी साठा उतरवून घेतला आणि देशव्यापी लॉकडाऊन आणि देशातील अनेक ठिकाणी कंटेनमेंट क्षेत्र जाहीर केल्यामुळे समोर येणाऱ्या सर्व आव्हानांचा सामना करत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसह (पीएमजीकेएवाय) विविध योजनां अंतर्गत राज्य सरकारांना 9.8 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) अन्नधान्य वितरीत केले आहे.
एफसीआयने यापूर्वीच पीएमजीकेएवाय अंतर्गत 80 कोटी लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती 5 किलो अन्नधान्याच्या मोफत वितरणासाठी राज्य सरकारांना 4.23 एमएमटी अन्नधान्य दिले आहे. या सर्व प्रयत्नांचे संपूर्ण लक्ष राज्य सरकारांना वेळेवर अन्नधान्य साठा वितरीत करण्यावर आणि सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) ला नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यावर आहे. सर्व प्रमुख राज्यांनी धान्य खरेदी सुरु केली असून 15 एप्रिल 20 नंतर गहू खरेदीला वेग आला आहे.
22 एप्रिल 20 पर्यंत केंद्रीय भांडारासाठी 3.38 एमएमटी गहू खरेदी करण्यात आला असून यामध्ये एकट्या पंजाबचे योगदान 2.15 एमएमटी इतके आहे. या हंगामात गहू खरेदीचे उद्दिष्ट 40 एमएमटी एवढे आहे. अशा जोमदार अन्नधान्य भंडारणामुळे सध्याच्या संकटाच्या काळात लोकांच्या गरजा भागविण्यासाठी अन्नधान्याची अतिरिक्त मागणी पूर्ण करून देखील एफसीआयचे धान्य कोठार पुन्हा जलदगतीने भरेल.
Published on: 24 April 2020, 05:56 IST