मुंबई
रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परिक्षण आणि बीज संशोधनावर भर द्यावा, अशा सूचना कृषीमंत्री धनजंय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्याची ताकद आहे. त्यासाठी ही योजना जास्त प्रभावी पद्धतीने राबविण्याची गरज आहे. त्यामुळे योजना अधिकाधिक प्रभावी पणे राबवावी, अशा सूचना मुंडे यांनी दिल्या आहेत.
यावेळी कृषिमंत्री मुंडे म्हणाले की, हवामान बदलामुळे उद्धवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि त्यानुसार पिकाचे उत्पादन घेण्यासंदर्भात तसेच बीज निर्मिती प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठामार्फत माती परिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांना पोस्टाद्वारे माती परीक्षण करण्यासाठी पाठविण्याची सुविधाही संबंधित विभागाशी चर्चा करून उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची मागणी आणि प्रतिसाद विचारात घेता आवश्यकता भासल्यास विद्यापीठातील माती परिक्षण केंद्रांची संख्याही वाढविण्यात येईल, असेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.
Published on: 03 August 2023, 12:26 IST