मुंबई: बांबू हे रोजगाराचे प्रमुख साधन आहे. 'रोटी, कपडा आणि मकान' या तिन्हीसाठी बांबूचा वापर केला जाऊ शकतो. राज्यात बांबूचे अधिकाधिक उत्पादन घेऊन देशाचे 'सकल राष्ट्रीय उत्पादन' (जीडीपी) वाढविण्याचा मानस वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी व्यक्त केला. ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे आयोजित बांबू उद्योग परिषदेत बोलते होते.
राज्य शासन, राज्य वनविकास प्राधिकरण, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री तथ राष्ट्रीय बांबू आयोगाचे सदस्य अण्णासाहेब एमके पाटील, कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, राज्य वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, झारखंड येथील उद्योग विभागाचे सचिव के. रवी कुमार, राज्य बांबू विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती.
श्री. मुनगंटीवार म्हणाले राज्यातील बांबू उद्योग क्षेत्रात विकास व्हावा यासाठी या उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशात बांबूचा वापर निरनिराळ्या उपयोगासाठी केला जातो. गरिबांसाठी बहुउद्देशीय लाकुड म्हणून बांबूस महत्त्व आहे. घरगुती वापरासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो. शिवाय याच्या उद्योगासाठी देखील बराच वाव आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात याचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे उद्योजकांनी पुढे येऊन उद्योग स्थापन करावे त्यांना आवश्यक ती मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल विश्वास श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.
बांबूपासून इथेनॉल निर्मीती होते, इमारत बांधणीसाठी देखील याचा उपयोग होतो. बांबूचा वापर वाढविल्यास शेतकरी समृद्ध होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील अमरावती, राहुरी, पुणे या विद्यापिठांसह चंद्रपूर येथील विविध शैक्षणिक विभागात अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. याशिवाय बांबू बोर्ड स्थापन केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात 12 हजार 90 कोटी रुपयांची भरीव तरतूद केंद्राने केली आहे. याचा उद्योजकांनी फायदा करुन घेतल्यास या क्षेत्रात उद्योग स्थापन होऊन शेतकऱ्यांचे जीवन आनंदी बनविता येईल, असे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
दिवसभर चाललेल्या या बांबू विकास परिषदेत बांबूतील गुंतवणुकीच्या संधीवर विचार मंथन करण्यात आले. उद्घाटन सत्रात राष्ट्रीय बांबू आयोगाचे सदस्य अण्णासाहेब एमके पाटील आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विचार व्यक्त केले.
Published on: 20 February 2019, 08:34 IST