सिंधुदुर्ग: चांदा ते बांदा योजनेखाली कल्पवृक्ष नारळापासून निरा, खोबरेल तेल, काथ्या अशा प्रक्रिया उद्योगांची साखळी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. या दृष्टीकोनातून संबंधित विभागांनी बचत गट व शेतकऱ्यांना प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल याबबतचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित बैठकीत केली. या बैठकीस निरापासून साखर, मध, गुळ तयार करणे, सुरंगी फुलांपासून अगरबत्ती व अत्तर, नारळाच्या सोडणांची वाहतूक, काथ्यासाठी कच्च्या मालाचे उत्पादन, प्रलंबित काथ्या प्रक्रिया युनिट, या प्रक्रिया युनिटसाठी जागेची उपलब्धता याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, उद्योजक प्रशांत कामत, नगराध्यक्ष दिलीप गिरप, चांदा ते बांदाच्या प्रकल्प अधिकारी नंदिनी घाणेकर, श्री. कथारे, खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. केंजले, केरळ वरुन क्वॉयर बोर्डाचे प्रा. मनोज अय्यर, एम.व्ही. अशोक, रणजीत सावंत, कृषी विद्यापीठाचे विजय दळवी, उद्योजक केळकर, अभिजीत महाजन आदी उपस्थित होते.
नारळाच्या झाडापासून अनेक पदार्थ, वस्तू उपलब्ध होतात. या दृष्टीकोनातून नारळाच्या सोडणापासून काथ्या, खोबऱ्यापासून खाण्याचे पदार्थ व खोबरेल, निरा उत्पादनातून निरा, निरेपासून साखर, चॉकलेट, गुळ आदी पदार्थ करणे यासाठी साखळी प्रक्रिया उद्योग उभारल्यास यामधून ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य निर्माण होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीस वाव असल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री म्हणाले की, काथ्या प्रक्रिया उद्योगाची एकूण 14 युनिट सिंधुदुर्गात उभारली जात आहेत. यापैकी सहा युनिट सुरू झाली आहेत. उर्वरित युनिट त्वरीत सुरू करण्याबाबत महसूल विभागाने जागा उपलब्धते बाबत प्रयत्न करावेत, निरा पासून साखर, चॉकलेट, मध उत्पादन करण्याबाबतचे प्रशिक्षण खादी ग्रामोद्योग मंडळाने घ्यावे, जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या माणगा या बांबूच्या जाती पेक्षा उती संवर्धन रोपवाटीकेद्वारे बांबूची रोपे तयार कराण्याबाबत कोकण कृषी विद्यापीठाने रोपवाटिका उभारण्याबाबत प्रस्ताव द्यावा आदी सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी केल्या.
यावेळी उत्ती संवर्धनाद्वारे बांबू रोपांची निर्मिती बाबत कोकण कृषी विद्यापीठाचे श्री. दळवी यांनी तर केळकर उद्योग समुहाचे श्री. केळकर यांनी सुरंगी पासून सुगंधी द्रव्ये व अगरबत्ती निर्मितीची माहिती दिली. अभिजीत महाजन यांनी व्हर्जिन कोकनट ऑईल बाबत माहिती दिली. प्रा. मनोज अय्यर यांनी केरळमधील काथ्या प्रक्रिया उद्योगाबद्दल सविस्तर विवेचन केले.
Published on: 15 January 2019, 08:49 IST