पुणे, देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर अल्पभूधारक शेतकरी आहेत, ते नेहेमीच शेतीत आंतरपीक घेत असतात, आणि यामधून ते लाखोंचे उत्पादन कमवतात. कमी शेतीत पहिले पीक निघायची वाट न बघता जर योग्य नियोजन केले तर नेहेमीच यामध्ये आपला फायदा होतो. तसेच जर या पिकांना कधी भाव मिळाला नाही, तर त्याचे खत देखील मुख्य पिकाला फायदेशीर ठरते. तसेच या पिकाला मोठा असा खर्च येत नाही. यामध्ये आता उसाच्या रानात हमखास घेतले जाणारे पीक म्हणजे फ्लॉवरचे पीक. अनेकजण यामधून चांगले पैसे कमवतात. तसेच हे कमी कालावधीचे पीक असल्याने जास्त कष्ट देखील घेण्याची गरज लागत नाही. यामुळे अनेकजण याकडे वळाले आहेत. यामध्ये काही ठराविकच पिके घेता येतात, मात्र ही पिके हमखास पैसे मिळवून देतात.
असेच काहीसे आळेफाटा वडगाव कांदळी जुन्नर येथील नीलकंठ सुखदेव भोर यांनी केले आहे. उसात फ्लॉवरचे आंतरपीक घेऊन अडीच लाख रुपयांचा नफा त्यांनी मिळवला आहे. त्यांनी एक एकर क्षेत्रात ८६०३२ या उसाच्या वाणाची रोपवाटिकेतून ६ हजार रोपे घेऊन लागवड केली. यामध्ये त्यांनी फ्लॉवरची शेती देखील केली आहे. भोर यांनी उसाची लागवड केल्यानंतर त्यामध्ये फ्लॉवरच्या धवल या जातीच्या रोपांची लागवड केली. शेणखत, कोंबडीखत या खतांबरोबरच रासायनिक खतांची व विद्राव्य खतांची मात्रा दिला.
तसेच त्यांनी वेळोवेळी औषधे फवारणी केल्यानंतर दोनच महिन्यात हे फ्लॉवर काढायला आली. त्यांनी एक एकर क्षेत्रातून १४० क्विंटल फ्लॉवरचे विक्रमी उत्पादन घेतले. यामध्ये त्यांना २५० रुपये प्रति दहा किलो बाजार भाव मिळाला यामधून त्यांना खर्च वजा जाता २.५० लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे. तसेच उसाच्या पिकातून सुद्धा त्यांना पैसे मिळणार आहेत. यामुळे त्यांना मोठी लॉटरी लागली आहे. यामुळे आता आंतरपीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. ऊस या पिकाचा कालावधी हा मोठा असतो. यामुळे उसाची लागण केल्यापासून तीन ते चार महिन्यांच्या काही पिकांचे आंतरपीक आपल्याला घेता येते.
ऊस पिकाचे कारखान्यांना लवकर गाळप होत नाही. सर्वसाधारणपणे १५ ते १८ महिन्यानंतर कारखाने ऊस तोडून येतात त्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळतात. यामुळे शेतकऱ्यांना दोन वर्षांनी उसाचे पैसे मिळतात. उसासाठी पदरचे भांडवल घालावे लागते. उसात सुरुवातीच्या काळात भाजीपाला पिकाचे आंतरपीक घेतल्यास उसाचे भांडवल व चांगला नफा मिळण्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरत आहे. यामुळे याकडे वळायला काही हरकत नाही.
Published on: 28 January 2022, 11:10 IST